मोटारीच्या अतिप्रखर दिव्याखाली ‘अंधार’, एलईडी-एचआयडी बल्बचा कारमध्ये सर्रास वापर; डोळे दिपल्याने अपघातांचे वाढते प्रमाण

वाहनांच्या वेगमर्यादेला ब्रेक लावण्यासाठी स्पीडगन, सीसीटीव्हीसारखी यंत्रणा सध्या राज्यात आहे; पण हेडलाइटमध्ये हॅलोजनसारखे अतिप्रखर दिवे लावणाऱया वाहनांवर कारवाई करणारी कोणतीही यंत्रणा राज्यातील पोलीस यंत्रणेकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहनचालकाचे डोळे दिपवून टाकणाऱया एलईडी, एचआयडी किंवा हॅलोजन दिव्यांचे हेडलाइट लावण्याचे प्रमाण राज्यात वाढत आहे. परिणामी अपघातांचा धोका वाढत आहे.

वाढत्या शहरीकरणाबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. मोठय़ा गाडय़ा घेण्याची स्पर्धाही वाढत आहे. या मोटारींना प्रेशर हाँर्न लावण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशा मोठय़ा वाहनांच्या वेगावर स्पीडगनच्या माध्यमातून वेगावर नियंत्रण ठेवले जाते. पण मोटारींच्या हेडलाईटमध्ये वापरल्या जाणाऱया अतिप्रखर दिव्यांच्या प्रकाशाच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा परिवहन विभाग किंवा पोलिसांकडे नाही. कारण हेडलाईटचे अतिशक्तीशाली दिव्यांमुळे समोरील वाहन चालकाचे डोळे दिपवून टाकतात. त्यामुळे डोळे दिपल्यामुळे वाहन चालवणे कठीण होते.

देशात पेंद्र सरकारच्या अखत्यारितील आँटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन आँफ इंडिया अर्थात एआरएआय ही संस्था वाहन उद्योगातली संशोधन व विकास नियम-धोरण व तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करते. या संस्थेच्या परवानगी नंतरच वाहनातील हेडलाईटला परावानगी दिली जाते. त्यानुसार हेडलाईटच्या दिव्यांच्या प्रखरतेची तपासणी करण्यासाठी हेडलाईट अँनालायझर हे यंत्र आहे. हेडलाईटच्या निकषांपेक्षा अधिक प्रखर प्रकाश फेकत असल्यास कारवाई होते. पण रस्त्यावर किंवा द्रूतगती महामार्गावर धावणाऱया वाहनाच्या हेडलाईटची तपासणी होत नाही.

नियम काय सांगतो
महामार्गावरून जाताना समोरच्या दिशेने कोणतेही वाहान नसेल तर हायबीम वापरण्याची परवानगी आहे. शहरांमध्ये तर मोटारींच्या हेडलाईला हायबीम वापरणे पूर्णपणे बेकायदा आहे. मात्र तरीही हल्ली शहरांमध्ये हायबीम सर्रासपणे वापरला जातो. हीयबीमचे दिवे वापरले तर अवघ्या पाचशे रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यात आहे.

प्रकाशाची तीव्रता मोजणारे यंत्र नाही
प्रमुख रस्त्यांवर किंवा द्रुतगती महामार्गावर स्पीडगनच्या माध्यमातून नियमभंग करणाऱयांवर लक्ष ठेवले जाते. वेगमर्यादा ओलांडली, तर स्पीडगनवर अचूक नोंद होते आणि संबंधित वाहनचालकाला मोबाईलवर चलन येते. त्याशिवाय सीसीटीव्ही पॅमेऱयांच्या माध्यमातून वेगावर लक्ष ठेवले जाते; पण मोटारींच्या हेडलाइटच्या दिव्यांची तीव्रता मोजणारी कोणतीही यंत्रणा परिवहन विभागाकडे नाही. वाहनाच्या फिटनेस चाचणीच्या वेळेस हेडलाईट अॅनालायझर या यंत्राद्वारे प्रकाशाच्या प्रखरतेच्या तीव्रतेची चाचणी होते; पण रस्त्यावरून वाहन धावत असताना दिव्यांच्या प्रखरतेची चाचणी करणारी कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नाही, अशी कबुली राज्याच्या परिवहन खात्यातील एका ज्येष्ठ अधिकाऱयाने दिली.