
चिपळूण पाटण मार्गावर कुंभार्ली घाट येथे रस्त्याच्या दुर्दशेमुळे शुक्रवारी पहाटे चार वाजता एक मालवाहू ट्रक रस्त्यात मध्यभागी उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास आठ तास ठप्प झाली होती. यादरम्यान छोटी चार चाकी वाहने जातील एवढाच मार्ग शिल्लक होता. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. हा अपघात कुंभार्ली घाटात असणाऱ्या मंदिराजवळ रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळेच घडल्याचे दिसून आले.
गत आठवड्यात कुंभार्ली घाटात रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक अपघात घडले. या घाटातील वाहतूक असंख्य खड्ड्यामुळे मंद गतीने सुरू आहे. वारंवार अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती कडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज पहाटे गुजरात कडे जाणारा मालवाहू ट्रक अवघड वळणावर रस्त्याला मधोमध पडलेल्या चारामुळे रस्त्याच्या मध्यभागीच उलटला. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. सदर अपघात पहाटे चारच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले.
सकाळी साडेअकरा वाजता कराड कडे जाणाऱ्या एका कंटेनर वरील पोकलेनने वळणावरील चरामध्ये थोडीफार माती टाकून दिल्याने काही बस तेथून दुपारी बारानंतर रवाना झाल्या. पहाटे चार ते दुपारी बारा या दरम्यान सर्व मालवाहक ट्रक घाटाच्या दोन्ही बाजूला रांगा लावून उभे होते.अलोरे आणि शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस ठाणे होमगार्ड अपघात स्थळी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या अपघातानंतर मार्ग सुरळीत सुरू करण्याकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. पहाटे चार वाजता अपघात घडूनही दुपारी बारापर्यंत अपघात स्थळी क्रेन पोहोचू शकल्या नव्हत्या. याबाबत वाहन चालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सदर घाट रस्ता येत्या आठवडाभरात तातडीने दुरुस्त न केल्यास या ठिकाणी रास्तारोको सारखे आंदोलन कोणतीही पूर्वकल्पना न देता करणार असल्याचे यावेळी वाहन चालकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
अवघड वळणावर मालवाहू ट्रक उलटल्यानंतर ट्रकच्या टॅंक मधील डिझेल रस्त्यावर सर्वत्र पसरल्यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाहने या ठिकाणी घसरत असल्याचे दिसून आले. हा सारा परिसर अत्यंत धोकादायक झाला असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल सखेत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.





























































