
मे महिन्याची सुट्टी सुरू असल्याने बच्चेकंपनी तसेच पर्यटकांची पावले सध्या अलिबागच्या निळाशार समुद्राचा आनंद लुटण्यासाठी वळत आहेत. अनेकदा वाहतूककोंडीमुळे या आनंदावर पाणी फिरले. मात्र शनिवार, रविवार आता तुम्ही बिनधास्त अलिबागला या. कारण 17 व 18 मे तसेच 24 व 25 मे असे चार दिवस (शनिवार, रविवार) अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनो, चला सुसाट अलिबागला… ट्रॅफिक जामचे नो टेन्शन !
पर्यटकांचा अलिबागमध्ये येण्याचा ओघ लक्षात घेऊन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शनिवार व रविवार अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. शनिवार व रविवार पर्यटकांची तुफान गर्दी होते. मांडवामार्गे तसेच रस्तेमार्गे राज्याच्या विविध भागातून पर्यटक येतात. त्यांची वाहने तसेच डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर अशा मोठ्या गाड्याही रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी अलिबागकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी होते. अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून आले आहे.
या गाड्यांना सूट
पर्यटकांचा हंगाम, वाहतूककोंडी, अपघात या बाबी लक्षात घेऊनच वाहतूक विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन आठवड्यातील शनिवार, रविवारी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यातून दूध, डिझेल, गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना मात्र सूट देण्यात आली आहे.