‘कार्टोसैट-3’चे लाँचिंग पुढे ढकलले, 25 नोव्हेंबरऐवजी आता 27 नोव्हेंबरला अंतराळात झेपावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 इस्रोने ‘कार्टोसैट-3’ या सॅटेलाइटचे लाँचिंग 48 तासांसाठी पुढे ढकलले आहे. 25 नोव्हेंबरऐवजी आता 27 नोव्हेंबरला हे सॅटेलाइट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून अंतराळात झेपावणार आहे. ‘कार्टोसैट-3’ सोबतच अमेरिकेचे 13 व्यावसायिक छोटे उपग्रहही अंतराळात सोडण्यात येतील.

हिंदुस्थानी सैन्यदलाची ताकद वाढविण्यासाठी इस्रो कार्टोसैट-3 हे सॅटेलाइट लाँच करणार आहे. 27 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी ‘कार्टोसैट-3’ अंतराळाच्या दिशेने झेप घेईल. यानंतर डिसेंबर महिन्यात इस्रो आणखी दोन सर्व्हिलान्स सॅटेलाइटस् रिसॅट-2 बीआर 1 आणि रिसॅट-2 बीआर 2 अंतराळात पाठविणार आहेत. कार्टेसैट सीरिजचे आतापर्यंत आठ सॅटेलाइट लाँच करण्यात आले असून कार्टोसैट-1 चे लाँचिंग 5 मे 2005 रोजी झाले होते.

कार्टोसैट-3 ची वैशिष्ट्ये

– सूक्ष्म कॅमेरा, जमिनीवरील एक फुटावरील कमी उंचीवरील हालचालीही अचूक टिपणार.

– विविध प्रकारच्या हवामानात पृथ्वीची छायाचित्रे घेण्यात सक्षम.

– जगातील सर्वात शक्तिशाली कॅमेरा; कोणत्याही देशाने इतका शक्तिशाली कॅमेरा लाँच केलेला नाही.

– कार्टोसैट-3 ला पृथ्वीपासून 450 किलोमीटर इतक्या उंचीवर स्थापन करण्यात येणार.

सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या हालचाली टिपणार

कार्टेसैट-3 चा उपयोग हिंदुस्थानच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी होणार आहे. तसेच हवामानासंबंधी माहितीही हे सॅटेलाइट देणार आहे. पाकिस्तान आणि तेथील दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यासाठी हे सॅटेलाइट म्हणजे सर्वात महत्त्वाची दुर्बिण ठरणार आहे. शत्रूंनी हिंदुस्थानविरोधी हालचाली केल्यास कार्टोसैट-3 च्या मदतीने सैन्यदल शत्रूच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करू शकणार आहे. उरी हल्ल्यानंतर सैन्याने पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यासाठी इस्रोच्या उपग्रहांच्या मदतीने दहशतवाद्यांच्या अड्डय़ाचा ठावठिकाणा लावण्यात आला होता.