ट्रम्प यांनी मर्यादा ओलांडली! कॅलिफोर्नियाची भूमिका, सैन्य पाठवण्याच्या निर्णयाविरोधात ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील असंतोषाने आता हिसंक वळण घेतले आहे. आता निदर्शक रस्त्यांवर उतरत आहेत. तसेच ट्रम्प यांनी निदर्शकांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी सैन्य पाठवण्याचा इशाराही दिला आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात तणावात वाढ झाली आहे. कॅलिफोर्नियाने ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे. लॉस एंजेलिसमध्ये गव्हर्नरच्या परवानगीशिवाय 2000 नॅशनल गार्ड सैन्य तैनात करण्याच्या निर्णयाविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला आहे. राज्य अधिकाऱ्यांनी या हालचालीला ‘बेकायदेशीर’ म्हटले आहे. तसेच आधीच तणावपूर्ण असलेले वातावरण अधिक बिघडू शकते, अशी शक्यताही वर्तवली आहे.

कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल रॉब बोंटा यांनी सोमवारी या खटल्याची माहिती देताना म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या संमतीशिवाय सैन्य तैनात केले आहे. बोंटा यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, हा कोणताही हल्ला किंवा बंडखोरी नाही. राष्ट्रपती जाणूनबुजून अराजकता आणि दहशत निर्माण करत आहेत, जेणेकरून ते त्यांचे राजकीय हित साध्य करू शकतील, असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांनी फेडरल कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप या खटल्यात करण्यात आला आहे. फक्त विशेष परिस्थितीत, जसे की परदेशी हल्ला किंवा अमेरिकन सरकारविरुद्ध मोठे बंड, राष्ट्रपतींना सैन्य पाठवण्याची परवानगी देतो. कॅलिफोर्निया सरकारने म्हटले आहे की सध्या अशी कोणतीही परिस्थिती नाही. लॉस एंजेलिसमध्ये इमिग्रेशन छाप्यांविरुद्ध हिंसक निदर्शने सुरू असताना ही तैनाती करण्यात आली आहे. परंतु गव्हर्नर न्यूसम आणि इतर डेमोक्रॅट नेते म्हणतात की राज्य सरकार या परिस्थिती स्वतःहून हाताळू शकते आणि संघीय सरकारकडून हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.

लॉस एंजेलिसमधील परिस्थिती चिघळली, हिंसाचाराला न जुमानता ट्रम्पने मरिनही केले तैनात

राज्यपाल न्यूसम यांनीही या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. त्यांनी ट्रम्प प्रशासनाला एक अधिकृत पत्र पाठवून सैन्य हटवण्याची मागणी केली आहे. हे पत्र संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांना लिहिले आहे. न्यूसम यांनी पत्रात लिहिले आहे की, लॉस एंजेलिसमध्ये नॅशनल गार्ड्स तैनात करण्याची गरज नाही. इतक्या बेकायदेशीर पद्धतीने आणि इतक्या काळासाठी सैन्य पाठवणे हे राज्याच्या सार्वभौमत्वाचे गंभीर उल्लंघन आहे. परिस्थिती आणखी बिघडवण्यासाठी हे पाऊल जाणूनबुजून उचलले गेले आहे असे दिसते. ट्रम्प या आगीत तेल ओतत आहेत. हे पाऊल केवळ बेकायदेशीरच नाही तर अनैतिक आणि असंवैधानिक देखील आहे. आम्ही उद्या न्यायालयात त्याला आव्हान देऊ.’ न्यूसम म्हणाले की, हे पाऊल कदाचित राजकीय हेतूने उचलले गेले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या विरोधाला न जुमानता, ट्रम्प प्रशासनाने मागे हटण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. पेंटागॉनने म्हटले आहे की गरज पडल्यास अधिक सैन्य पाठवले जाईल. रविवारी, यूएस नॉर्दर्न कमांडने सांगितले की दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये तैनात असलेले सुमारे 500 मरीन लॉस एंजेलिसला पाठवण्यासाठी सज्ज आहेत.