
बडतर्फ जवान चंदू चव्हाण याने युट्यूबवरून हिंदुस्थानी सैन्य दलाबद्दल खोटे व बदनामीकारक व्हिडीओ प्रसारीत केले आहेत, तसेच जवानांमध्ये बंडाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धुळे जिह्यातील मोहाडी येथील चंदु बाबुलाल चव्हाण हा सप्टेंबर 2016 मध्ये सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. सुमारे चार महिने तो पाकिस्तानच्या ताब्यात होता. हिंदुस्थानात परतल्यावर त्याला निष्काळजीपणाचा ठपका ठेवत लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावली होती, नंतर बडतर्फही केले. तो आता वर्षभरापासून स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर सैन्य दलाबाबत बदनामीकारक चित्रफिती प्रसारीत करत आहे. याबाबत आर्टिलरी सेंटरमधील नायब सुभेदार सचिन गुंजाळ यांनी रविवारी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करण्यास नकार दिल्याने बडतर्फीची कारवाई झाल्याचे चंदु सांगत आहे. देशात 15 लाख बडतर्फ जवान असून, त्यांच्यावर अन्याय होत असल्याची चुकीची विधाने करीत आहे. बंदी असतानाही सैन्य दलाचा गणवेश तो परिधान करतो. तुमच्या मुलांना सैन्य दलात भरती करू नका, असे वक्तव्य करीत सैन्यदलावर, अधिकाऱ्यांवर आरोप करत आहे. त्याचे हे कृत्य सैन्यदलात कर्तव्यावर असणाऱ्या जवानांमध्ये बंड घडवून आणण्यास चिथावणी देणारे, त्यांना कर्तव्यापासून विचलीत करण्याचा प्रयत्न करणारे आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक जे. बी. शिरसाठ अधिक तपास करत आहेत.