लग्नात मानपान केला नसल्याच्या रागातून महिलेचा छळ; सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नामध्ये मानपान केला नसल्याचा राग मनात धरत महिलेचा छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नात मानपान केला नाही. त्यामुळे आता पुण्यात घर घेण्यासाठी 7 लाख रुपये दिल्याशिवाय नांदविणार नाही, अशी धमकी देत सासरच्या मंडळींनी महिलेला माहहाण करुन तिचा छळ केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी महिलेचे पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील शशिकांत साळुंके, शशिकांत शिवाजी साळुंके आणि आशा शशिकांत साळुंके (सर्व रा. इंदिरानगर, सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रिया स्वप्नील साळुंके (वय 25) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया आणि स्वप्नीलचे जुलै 2019 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पती स्वप्नील, सासू आशा आणि सासरे शशिकांत यांनी प्रियाचा छळ करण्यास सुरुवात केली. प्रियाच्या कुटुंबियांनी लग्नामध्ये मानपान केला नाही, फर्निचर दिले नाही. त्यामुळे पुण्यात घर घेण्यासाठी 7 लाख रुपये देण्याची मागणी ते करत होते.

पैसे दिल्याशिवाय प्रियाला नांदविणार नसल्याची धमकी सासरच्यांनी दिली. वेळोवेळी प्रियाशी भांडण करुन तिला मारहाण केली. लग्नात मानपान केला नाही, फर्निचर दिले नाही, घर घेण्यासाठी पैसे देत नाही, याचा राग मनात धरून आपला शारीरिक आणि मानसीक छळ करण्यात आल्याचे प्रियाने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस अधिक तपास करीत आहेत.