
कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे पती, सासू, सासरे यांनी छळ करत घर बांधण्यासाठी माहेरहून पंधरा हजार रुपये घेऊन ये असा तगादा लावला. पैशासाठी विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली संदीप अनर्थे (32) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
विवाहितेचा पती संदीप भाऊसाहेब अनर्थे, सासरे भाऊसाहेब कचरू अनर्थे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मृत वैशालीचा भाऊ निलेश आनंदराव कांबळे (35) यांनी मृत महिलेचे पती संदीप अनर्थे, सासु रत्नाबाई अनर्थे, सासरे भाऊसाहेब अनर्थे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. सासरच्यांनी घरासाठी पंधरा हजार रुपये घेऊन ये, म्हणून आपली बहीण वैशालीचा शारीरिक-मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने बुधवारी घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. वैशालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप अनर्थे, सासरे भाऊसाहेब अनर्थे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि इंगळे हे अधिक तपास करीत आहेत.






























































