
सामना प्रतिनिधी । लातूर
फुलझाड काढण्याच्या क्षुल्लक कारणावरुन निलंगा तालुक्यातील तुपडी येथे हाणामारीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर ज्ञानोबा भुरे (रा. तुपडी, ता. निलंगा) यांनी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. व्यंकट राम भुरे व इतर तिघांनी परमेश्वर यांच्या घरासमोर असलेले मोगऱ्याच्या फुलाचे झाड काढण्यावरून वाद झाला. त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. व्यंकट आणि इचर तिघांनी परमेश्वर यांना रॉडने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी परमेश्वर यांचे आई – वडिल आले असता त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करत धमकी देण्यात आली. या प्रकरणी व्यंकट भुरे व इतर तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































