
राज्याच्या माजी गृहमंत्र्यांविरोधात 100 कोटी वसुलीचा गंभीर आरोप करणारे मुंबई व ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परमबिर सिंह आणि मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह 33 पोलीस अधिकाऱयांविरोधात अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री अॅट्रॉसिटी अँक्टसह अन्य विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी परमबिर सिंह यांच्यासह 33 पोलीस अधिकाऱयांविरोधात राज्य सरकार आणि वरिष्ठांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार बुधवारी रात्री घाडगे यांच्या तक्रारारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबिर सिंह यांनी हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार केला होता अशी तक्रार पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच अॅण्टी करप्शन ब्युरोचे पोलीस महासंचालकांकडे केली होती. याबरोबरच परमबिर सिंह यांच्यासह 33 पोलीस अधिकाऱयांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली होती. हि घटना घाडगे कल्याणच्या बाजार पेठ पोलीस ठाण्यात असताना घडली असल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.या प्रकरणात पराग मणेरे, डॉ संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय पैलकर यांच्यासह एकूण 33 पोलिस अधिकारी असून ते देखील गोत्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी देखील परमबिर सिंह यांचा तुघलकी कारभाव व भ्रष्ट्राचाराविरोधात राज्य सरकार व पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. ते प्रकरण ताजे असतानाच पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी परमबिर सिंह यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱयांविरोधात तक्रार केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत अकोल्यात गुन्हा दाखल झाला आहे.





























































