
परवानगीशिवाय रॅली काढल्यावरुन गंगाखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. परभणी जिल्ह्यातील आचारसंहिता भंग करणारा हा पहिलाच गुन्हा आहे.
जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या आदेशाने जमावबंदी आदेश लागू आहे. तसेच राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बेकायदेशीर जमाव करत परवानगीशिवाय रॅली काढल्याने आचारसंहितेचा भंग झाला. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचाही भंग करण्यात आल्याने शुक्रवारी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडी अंमलबजावणी संचालनालयतर्फे गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गंगाखेड शहर बंदचे आवाहन केले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे भंग करून व विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता चालू असताना बेकायदेशीर जमाव जमा करून शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढली. तसेच तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन सादर केले होते. यांच्यावर गुन्हा दाखल याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासह इतर 30 ते 40 पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरुद्ध आचार संहिता भंग आणि जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचा भंग करून रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड करीत आहे.

































































