‘डिजिटल इंडिया’पुढे रोखीची डोकेदुखी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळे एकीकडे कॅशलेस व्यवहार वाढताहेत, मात्र दुसरीकडे रोखीचे प्रमाणही चढेच असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून उघड झाले आहे. मार्च 2019पर्यंत चलनातील रोखीचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढून 21.10 लाख कोटींवर गेले. रोखीचे हे वाढते प्रमाण ‘डिजिटल इंडिया’च्या वाटचालीदरम्यान हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरत आहे.

नोटाबंदीनंतर देशात डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. हा कॅशलेस व्यवहार वाढत असताना चलनातील रोखीचे प्रमाण आटोक्यात येईल, अशी सरकारला अपेक्षा होती. मात्र रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून पुढे आलेल्या आकडेवारीने सरकारचा हिरमोड झाला आहे. चलनातील रोखीमध्ये नोटांची संख्या 6.2 टक्क्यांवरून 10.87 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यात पाचशे आणि दोन हजारच्या नोटा 82 टक्के आहेत. डिजिटलच्या माध्यमातून जून 2019 अखेर 23.30 अब्ज इतके देयक व्यवहार झाले आहेत.

काय म्हणाल्या अर्थमंत्री
– 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य गाठण्यासाठी सरकार पावले उचलत असून बँकांकडून कर्जवसुली विक्रमी झाली आहे. 250 कोटींहून अधिक कर्ज घेणाऱयांवर सरकारचे खास ‘लक्ष्य’ आहे.

– नीरव मोदीसारखी प्रकरणे आणखी घडू नयेत यासाठी स्विफ्ट बँकिंग सिस्टम लागू केली असून आतापर्यंत 3.58 लाख बोगस कंपन्यांना टाळे ठोकले आहे.

– थकीत कर्जाच्या (एनपीए) आकडेवारीतही घट झाली असून एनपीएची रक्कम 8.65 लाख कोटींड’वरून 7.90 लाख कोटींवर घसरली आहे. कर्जवसुलीमुळे 14 सरकारी बँकांच्या नफ्यात वाढ झाली असून तीन बँकांच्या विलीनीकरणामुळे किरकोळ कर्जप्रमाणात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.