जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत मिळणार

471

राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींकडे जात वैधता प्रमाणपत्र नसले तरीही त्यांना निवडणुकीत भाग घेता यावा यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अंतिम तारखेत वाढ करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार संबंधित अधिनियमात सुधारणा करून सध्या असलेली 30 जून 2019 ही अंतिम तारीख 30 जून 2020 करण्यात आली आहे.

राज्यातील कार्यरत जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत. समित्यांकडील कार्यबाहुल्य तसेच निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात सादर होणारे अर्ज यामुळे नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना जात पडताळणी समित्यांकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे यापुढे होणाऱ्या निवडणुकांचे नामनिर्देशन पत्र भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ यापुढील निवडणुकांमधील इच्छुकांना मिळणार नव्हता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियम-1888, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करून सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख 30 जून 2019 करण्यात आली होती. त्यात सुधारणा करून ती 30 जून 2020 करण्यास मान्यता देण्यात आली.

राज्‍य मागास आयोग, मराठा आरक्षणासह संबधित विषय इमाव, विजाभज, विमाप्र विभागकडे वर्ग

मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्‍य मागास आयोग आणि इतर संबधित विषय राज्याच्या इमाव, विजाभज, विमाप्र कल्याण विभागाकडे समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्याच्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांतर्गत अधिकचे विषय म्हणून मराठा, आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्य मागासवर्ग आयोग, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या सूचित एखादी जात समाविष्ट करणे, त्याचप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गांच्या जात विषयक सर्व बाबी या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या