शिवसेनेचे संजय घाडी यांच्या जात पडताळणीविरोधातील याचिका मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांच्या जात पडताळणीविरोधात भाजपने दाखल केलेली याचिका आज कोर्टाच्या आदेशानंतर मागे घेण्यात आली. घाडी यांच्याकडे जातीबाबत सर्व पुरावे असताना नाहक याचिका दाखल केल्याबद्दल कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले. कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपला चांगलाच दणका बसला आहे.

संजय घाडी हे दहिसर, अशोकवन, प्रभाग क्र. 5मधून निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर घाडी यांनी पालिका कायद्यानुसार सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले. मात्र या प्रभागातील भाजपचे पराभूत उमेदवार मोतीभाई देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात घाडी यांच्या जात पडताळणीविरोधात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती कोलाबावाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या बाजूने कौन्सिल गोडबोले व ऍड. संजय सिंग यांनी बाजू मांडली, तर संजय घाडी यांच्या वतीने ऍड. बाळकृष्ण जोशी यांनी बाजू मांडली. संजय घाडी हे हिंदू-कुणबी जातीचे असून त्यांच्या वडिलांचे व काकांचे पुरावे या वेळी सादर करण्यात आले. हे पुरावे ग्राह्य असल्यामुळे कोर्टाने याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिका मागे घेतली.

…तर किंमत मोजावी लागेल

घाडी यांच्याकडे जातीबाबत सर्व पुरावे असताना खोटी याचिका दाखल केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. अशा खोटय़ा याचिकांमुळे जन्माचे दाखले व इतर दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून बदनाम करण्याचे प्रयत्न याचिकाकर्त्यांकडून केले जात असल्याचे न्यायालयाने परखडपणे सांगितले. संजय घाडी हे हिंदू-कुणबी जातीचे असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध होते. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घ्यावी अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल, असेही न्यायालयाने बजावले. यानंतर याचिका मागे घेण्यात आली.