जातीनिहाय जनगणनेबाबत योग्य निर्णय घेऊ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने अलिकडच्या काळात दिलेल्या काही निकालांमुळे जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजतोय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर जातीनिहाय जनगणनेचं काय होणार? आणि केंद्रानं ती लवकर करावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी मोदी यांनी जातीनिहाय जनगणनेबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याची माहिती नितीश कुमार यांनी दिली.

जातींनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी बिहारमधील दहा पक्षांच्या नेत्यांचं शिष्टमंडळ आज पंतप्रधान मोदी यांना भेटलं. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेल्या या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांचे नेते सहभागी झाले होते. आमची जी बाजू आहे ती आम्ही पंतप्रधानांसमोर मांडली. जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही का करत आहोत हेही त्यांना पटवून दिल्याचे नितीशकुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांना कोणत्याही परिस्थितीत जातिनिहाय जनगणना करण्यास सांगितलं आहे. त्यांनी आमचं म्हणणं खूप गांभीर्याने ऐकलं आहे.

जातीनिहाय जनगणनेबाबत मोदींनी आम्हा सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. राज्य विधानसभेत दोनदा जातीच्या जनगणनेचे ठराव कसे पारित झाले, हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान या सर्व गोष्टींचा नक्कीच विचार करतील. – नितीश कुमार

जातीनिहाय जनगणनेमुळं देशाला फायदा होईल. मंडल आयोगापूर्वी देशात किती जाती आहेत हे माहीत नव्हते. मंडल आयोगानंतर समजलं की, देशात हजारो जाती आहेत. जर जनावरांची मोजणी होते, झाडांची मोजणी होते, तर मग माणसांचीही होणं आवश्यक आहे. – तेजस्वी यादव

जातीनिहाय जनगणनेला पंतप्रधान तयार होतील – नवाब मलिक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी एम्पिरिकल डेटाची आवश्यकता आहे. यासाठी देशात जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी जोर धरत असून यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे प्रवत्ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशातील अनेक पक्ष जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करीत असून पंतप्रधान याला तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.