
आर्यन खान ड्रग प्रकरणात 25 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची पाच तास चौकशी केली. पहिल्या सत्रात तीन आणि दुसऱ्या सत्रात दोन तास चौकशी केली. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वानखेडे सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले.
दोन वर्षांपूर्वी एनसीबीने कार्डेलिया क्रूझवर कारवाई केली. एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली होती. ड्रग प्रकरणात बॉलीवूड लिंक समोर आल्याने एनसीबीने काही बॉलीवूडशी संबंधित असणाऱ्यांची चौकशी केली होती. ड्रग प्रकरणात आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप झाला. त्याची गंभीर दखल एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयातील दक्षता पथकाने घेतली.
तेव्हा दिल्लीहून चौकशीसाठी खास पथक मुंबईत आले होते. त्या पथकाने तेव्हा वानखेडे यांची चौकशी केली होती. चौकशीचा अहवाल एनसीबी मुख्यालयाला सुपूर्द केला होता. आर्यनच्या सुटकेसाठी पैसे मागितल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. नुकतेच सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने वानखेडे यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. त्या समन्सनुसार आज सकाळी वानखेडे सव्वादहा वाजता सीबीआयच्या बीकेसी येथील कार्यालयात आले. वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून खास पथक मुंबईत आले आहे. या पथकाने पहिल्या सत्रात तीन आणि दुसऱ्या सत्रात दोन अशी पाच तास चौकशी केली. सीबीआयच्या अधिकाऱयाने वानखेडेंसाठी खास प्रश्नावली तयार केली होती. पाच तास चौकशी झाल्यावर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वानखेडे हे सीबीआय कार्यालयाबाहेर आले. आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याला एनसीबी कार्यालयात आणले गेले होते तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले जाणार असल्याचे समजते.





























































