सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आणखी वाढणार; दहावीला आता ‘सामान्य गणित’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दहावीच्या परीक्षेची काठीण्यपातळी कमी करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) परीक्षा पद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे. गणिताची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सामान्य गणित’ (बेसिक मॅथ्स) या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. वर्ष 2020 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेपासून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ‘सामान्य गणित’ हा विषय निवडता येणार आहे.

वर्ष 2020 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेपासून सीबीएसईची गणिताची परीक्षा दोन स्तरावर होणार आहे. सामान्य गणित आणि गणित (सध्या अभ्यासक्रमात असलेले). यातील सामान्य गणित हा विषय सोपा असून गणित हा विषय सध्याच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. गणित विषय कच्चा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य गणित हा विषय अभ्यासक्रमात आणला आहे. मात्र सामान्य गणित निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे उच्च शिक्षणात गणित विषय निवडता येणार नाही.

एसएससी बोर्डाने ‘सामान्य गणित’ विषय बंद केला

सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम बदलणाऱ्या एसएससी बोर्डाने काही वर्षांपूर्वीच दहावीच्या परीक्षेतील सामान्य गणित हा विषय बंद केला आहे. मात्र आता सामान्य गणित हा विषय सुरू करणाऱ्या सीबीएसई बोर्डामुळे राज्य शिक्षण मंडळ तोंडघशी पडले असून पुन्हा हा विषय सुरू करणार का, असा सवाल शिक्षण वर्तुळातून होत आहे. सीबीएसईच्या या निर्णयामुळे भविष्यात अकरावी प्रवेशाच्या स्पर्धेत एसएससीचे विद्यार्थी आणखी मागे पडणार आहेत. आधी सामान्य गणित विषय रद्द केला आता तोंडी परीक्षाही होणार नसल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत फरक पडणार आहे.

  • या दोन्ही परीक्षांसाठी अभ्यासक्रम, लेक्चर, अंतर्गत परीक्षा सारख्याच असणार आहेत. दोन्ही परीक्षांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम शिकणे बंधनकारक आहे.
  • दहावीचा परीक्षा अर्ज भरताना सामान्य गणित निवडाचे की गणित याचा निर्णय विद्यार्थी घेऊ शकतात.
  • सामान्य गणिताची सवलत ही फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच लागू असणार आहे.
  • सामान्य गणित विषय घेणारा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्याला पुढे जाऊन गणिताची परीक्षा देता येईल.