आता विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, CBSE चा मोठा निर्णय; जुलैपासून ‘त्रिभाषा सूत्र’ अनिवार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची सुचना जारी केली असून या विद्यार्थ्यांच्या भाषा धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026- 27 मधील 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता तीन भाषांचा (त्रिभाषा सूत्र) अभ्यास करणे सक्तीचे असणार आहे. यासंदर्भात शनिवारी 15 मे 2026 रोजी जारी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, हा नवा नियम 1 जुलै 2026 पासून सर्व CBSE शाळांमध्ये लागू होईल. मात्र, विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10 वीच्या बोर्ड परीक्षेत या तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केलेल्या नव्या रचनेनुसार विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल, ज्यांना R1, R2 आणि R3 असे नाव देण्यात आले आहे. यात महत्त्वाच्या अटी दिल्या आहेत. या त्रिभाषा सूत्र अभ्यासक्रमात दोन भारतीय भाषा बंधनकारक असणार आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा या मूळ भारतीय (Native Indian) असणे आवश्यक आहे. तिसरी भाषा R3 म्हणून परदेशी भाषा शिकण्याची संधी मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. जर विद्यार्थ्यांना फ्रेंच, जर्मन यांसारखी परदेशी भाषा शिकायची असल्यास, ते तिसरी भाषा म्हणून त्या भाषेची निवड करू शकतात. पण त्यासाठी पहिल्या दोन भाषा भारतीय असणे गरजेचे आहे. किंवा विद्यार्थी चौथी अतिरिक्त भाषा म्हणूनही परदेशी भाषा निवडू शकतात.

बोर्डाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, तिसऱ्या भाषेसाठी (R3) कोणतीही अधिकृत बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. या विषयाचे मूल्यमापन पूर्णपणे शालेय पातळीवर म्हणजेच अंतर्गत (Internal Assessment) पद्धतीने केले जाईल. या गुणांची नोंद अंतिम गुणपत्रिकेवर (Certificate) केली जाईल. तसेच महत्त्वाचे म्हणजे या विषयात कमी गुण मिळाले किंवा काही अडचण आली तरी कोणत्याही विद्यार्थ्याला 10 वीच्या बोर्ड परीक्षेला बसण्यापासून रोखले जाणार नाही.

सध्याचे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यातच सुरू झाले असल्यामुळे, शाळांना या नवीन पद्धतीशी आणि NCERT च्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. सध्या इयत्ता नववीचे विद्यार्थी त्यांच्या निवडलेल्या तिसऱ्या भाषेसाठी इयत्ता सहावीची R3 पाठ्यपुस्तके (2026-27 आवृत्ती) वापरतील. या तिसऱ्या भाषेत एकूण 19 भाषांचा समावेश असून या भाषेतील पाठ्यपुस्तके 1 जुलैपूर्वी शाळांना उपलब्ध करून दिली जातील.