
लोकशाही प्रणाली असलेल्या हिंदुस्थानातील ‘सीबीएसई’ या प्रमुख शिक्षण मंडळाने लोकशाहीचा पाठच अभ्यासक्रमातून वगळला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमांत 30 टक्के कपात केली आहे. त्यानुसार मंडळाने सामाजिक शास्त्र विषयातील नागरिकत्व, शेतकऱयांचे अधिकार, लोकशाही आणि कैकिध्य, लिंग, धर्म आणि जाती, धर्मनिरपेक्षता, प्रसिद्ध लोकलढे आणि चळवळी, वने आणि वन्यजीव ही प्रकरणे अभ्यासक्रमातून बाद केली आहेत.
अभ्यासक्रम कपातीच्या नावाखाली महत्वाची प्रकरणे वगळण्याच्या सीबीएसईच्या या निर्णयाचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. कोरोनामुळे देशभरातील विविध अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वेळापत्रक बिघडले आहे. शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करण्यास खूप कमी कालावधी मिळणार आहे. त्यानुसार मंडळांनी अभ्यासक्रम कमी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. सीबीएसई मंडळाने चालू शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रम कपात केला आहे. ही कपात करताना महत्त्वाचे धडे ठेवण्यात येणार असल्याचे सीबीएसईने म्हटले होते. मात्र बुधवारी सीबीएसईच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले सुधारित अभ्यासक्रम पाहून शिक्षकांना धक्का बसला.
लोकशाही मूल्ये अभ्यासक्रमातून कगळण्याचे कारण काय?
सीबीएसई मंडळाने अभ्यासक्रमातून सुजाण नागरिकत्व तयार करणारे घटकच वगळले आहेत. मंडळाला लोकशाही मुल्यांची माहिती विद्यार्थ्यांना द्यायची नाही का? असा सवाल शिक्षक भारती या संघटनेचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केला आहे. शेजारील पाकिस्तान अथवा चीन मधील व्यक्तिंना हिंदुस्थानातील नागरिकांइतके स्वातंत्र्य उपभोगता येते का? सीबीएसई हे सरकारी शिक्षण मंडळ आहे. ते असले प्रताप कोणाच्या आशीर्वादाने करत आहे, असा सवालही सरोदे यांनी उपस्थित केला.
अभ्यासक्रमात अशी केली कपात
– नववीच्या अभ्यासक्रमातून नागरिकत्व, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, जैवविविधता ही प्रकरणे वगळली आहेत.
– दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयातून धर्म -जाती, सामाजिक चळवळ,जंगल संपदा, वृक्षतोड, सामाजिक अधिकार हे धडे वगळले आहेत.
– अकरावीच्या अभ्यासक्रमातून शेतकऱयांचे अधिकार, गावातील सावकारांचे व्यवहार, जमीनदार, जमिनी बळकावणाऱया सावकारांविरोधातील शेतकऱयांची आंदोलने वगळले आहेत. अशीच परिस्थिती बारावीच्या अभ्यासक्रमाची आहे.



























































