CBSE बारावीच्या निकालात 5.38 टक्क्यांची वाढ, दीड लाखाहून अधिक विद्यार्थी नव्वदीपार

388
फोटो- प्रातिनिधीक

कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा या निकालात तब्बल 5.38 टक्क्यांची वाढ झाली असून एकूण निकाल 88.78 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत तब्बल 1 लाख 57 हजार 934 विद्यार्थ्यांना 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यांपैकी 38 हजार 686 विद्यार्थी 95 टक्क्यांच्या पुढे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईनेही यंदा गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही.

cbse-exam-result-student-jumping

यंदा 11 लाख 92 हजार 961 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यांपैकी 10 लाख 59 हजार 080 विद्यार्थी पास झाले आहेत. गेल्यावर्षी निकालाची टक्केकारी 83.40 इतकी होती. मुलांच्या तुलनेत मुलींचे पास होण्याचे प्रमाण याहीवर्षी अधिक आहे.

लखनऊची विद्यार्थिनी देवांशी हिला सीबीएसईच्या परीक्षेमध्ये 100 टक्के मार्क मिळाले आहेत.
लखनऊची विद्यार्थिनी देवांशी हिला सीबीएसईच्या परीक्षेमध्ये 100 टक्के मार्क मिळाले आहेत.

मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांच्या निकालात कमालीची घट झाली आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 5.96 टक्क्यांनी जास्त आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परीक्षेत पास झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले.

पुन्हा परीक्षेची संधी

या निकालाने ज्या विद्यार्थ्यांचे समाधान होणार नाही त्यांना सीबीएसई बोर्ड पुन्हा परीक्षेची संधी देणार आहे. ही संधी केवळ बारावीच्या विद्यार्थ्यांनाच मिळणार असून केंद्र सरकारशी चर्चा करून लवकरच या परीक्षेची तारीख सीबीएसई बोर्ड जाहीर करणार आहे.

पुणे विभागाचा निकाल 90.24 टक्के;सर्वाधिक निकाल त्रिवेंद्रम विभागाचा

पुणे विभागाचा निकाल 90.24 टक्के इतका लागला आहे. सर्वाधिक 97.67 टक्के निकाल त्रिवेंद्रम विभागाचा लागला असून पाटणा विभागाचा निकाल सर्कात कमी 74.57 टक्के इतका लागला आहे. चेन्नई विभागाचा निकाल 96.17 टक्के इतका लागला आहे.

या आधारे निकाल

  • ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल सामान्य पद्धतीने जाहीर होणार आहे.
  • तसेच तीन विषयांच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम दोन विषयांतील सरासरी एवढे गुण दिले आहेत.
  • तीनहून अधिक विषयांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित विषयांचे गुण सर्वोत्तम तीन विषयांच्या सरासरीप्रमाणे देण्यात आले आहेत.
  • ज्या विद्यार्थ्यांनी एक किंवा दोन विषयांचीच परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल वर्षभरातील कामगिरी, अंतर्गत मूल्यमापन, प्रॅक्टीकल मधील गुणांनुसार देण्यात आले आहेत.

निकालाची वैशिष्टय़े

  • 27 जुलैपासून सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत विद्यार्थी निकाला संदर्भात 1800118004 या टोल प्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
  • विद्यार्थ्यांना डीजी लाँकर मोबाईल अँपच्या माध्यामातून मार्कशीट, स्कील सर्टीफिकेट डाऊनलोड करता येईल.
  • यंदा सीबीएसईने गुणपत्रिकेवर ‘नापास’ या उल्लेखाऐवजी ‘Essential Repeat’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या