16 मार्चपासून नाणारमध्ये विजयोत्सव,उद्धव ठाकरे यांना निमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नाणार येथील प्रस्तावित विनाशकारी पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर कोकणवासीयांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. या विजयाबद्दल येत्या 16 मार्चपासून नाणारमध्ये विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. चित्ररथ, पोवाडे, गजर आणि नाटय़ाविष्काराच्या माध्यमातून नाणारच्या यशस्वी आंदोलनाची झलक यावेळी पाहायला मिळणार आहे. नाणारवासीयांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या विजयोत्सवाचे निमंत्रण दिले.

उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. शिवसेनेने तो शब्द खरा करून दाखवला. शिवसेनेच्या मागणीमुळेच नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने गेल्या शनिवारी रद्द केली. त्यानंतर कोकणवासीयांनी फटाके फोडून शिवसेनेचे आभार मानले. आता येत्या 16 आणि 17 मार्च असे दोन दिवस नाणारमध्ये मोठा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे.

या विजयोत्सवाचे निमंत्रण देताना रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अशोक वालम, रामचंद्र भडेकर, नितीन जठार, गिरीश मोंडे, योगेश नाटेकर, विलास नार्वेकर, जैतापूर अणुऊर्जीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण यांच्यासह शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

या विजयोत्सवादरम्यान कोकणची समृद्धी आणि निसर्गवैभव जगाला दाखवण्यासाठी 16 मार्च रोजी सकाळी विविध चित्ररथ संपूर्ण नाणारमध्ये फिरवण्यात येणार आहेत. नाणारचे आंदोलन नाटय़रूपाने सर्वांसमोर साजरे केले जाणार आहे. या नाटकामध्ये गावकऱ्यांनीच भूमिका केल्या आहेत. नाणारमध्ये एकाच ठिकाणी 101 सत्यनारायण पूजा करून देवाचेही आभार मानले जाणार आहेत. याशिवाय 17 मार्चला सायंकाळपासून नाणारवर आधारित पोवाडे, गजराचा कार्यक्रम तसेच मनोरंजनासाठी लावणीचा कार्यक्रम होणार आहे.