
अदिती सारंगधर,[email protected]
अनुपमा मुखर्जी… तथाकथित सेलिब्रिटी नाहीए ती… पण खूप खऱया भावनेने प्राण्यांवर प्रेम करते… ती प्राण्यांशी बोलते… अरण्याशी बोलते… अवनी वाघिणीशी शेवटचा संवाद अनुपमाने साधला होता….
काही संभाषणे आपल्याला व्यक्ती म्हणून अंतर्बाह्य बदलतात. विचार करायला भाग पाडतात. आपण खूप बेसिक आहोत… वागतोय… राहतोय… विचार करतोय… याची जाणीव करून देतात. असा आजचा फोन कॉल… आणि मला खात्री आहे की आजचे हे ‘जिवलग’ तुम्हालाही असाच विचार करायला भाग पाडणार आहे.
एक ऑक्टिव्हिस्ट आहे. ऑनिमल थेरपिस्ट. कम्युनिकेट करते ती जंगल, प्राणी यांच्याशी… अनुपमा मुखर्जी. तिच्याशी बोलू या आठवडय़ाच्या आर्टिकलसाठी… फोन करते ती बिझी, ती एका मोर्चात… ती एक मीटिंगमध्ये… अखेरीस आम्ही बोललो. ‘अवनी’ नावाच्या वाघिणीची जी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली त्या संदर्भात सशक्तपणे लढणारी अनुपमा… खाडकन जाग आल्यासारखं झालं आणि पुढचं संभाषण सुरू झालं.
‘अगं मी लहानपणापासून अनेक प्राण्यांना फॉस्टर केलंय. आमच्या आजोबांनाही खूप आवडायचे प्राणी… दिल्लीतसुद्धा खरं तर ये-जा असायची घरी… पण माझा असा पहिला पेट म्हणजे माऊ… अचानक एक दिवस बंद दारावर खूडखूड झाली. दार उघडलं तर हा थेट आतच आला. का माहीत नाही, पण माऊ आलं तोंडात. नावाला फक्त ते वेगळं स्पिशी होतं, पण आम्ही जेवलो, खेळलो, झोपलो, रडलो, चिडलो, हसलो, वाढलो एकत्रच… भावाबहिणीसारखे. हळूहळू वडिलांनासुद्धा त्यानं प्रेमात पाडलं. बा…ऊ…, बा…ऊ… असं खरं तर हाक मारायचा तो डॅडना. ‘बेबी को जगाओ’ म्हटलं की धावत येऊन झोपलेल्या माझ्याकडे एकटक बघत राहायचा. थोडय़ा वेळाने बारीक आवाज करायचा… मग मला झोपेतही लक्षात यायचं कुणीतरी बाजूला येऊन उभं राहिलंय. मग उठले की हसल्यासारखं करून निघून जायचा. आणखी एक त्याची गंमत… बंगालीत ‘पिकपिकी’ म्हणजे पाल. माऊ पिकपिकी असं म्हटलं की, भिंतीवर उडय़ा मारायचा. फ्रेममधून अर्धी बाहेर आलेली पाल दिसली की जिंकल्यासारखा माझ्याकडे बघायचा… मग उरलेली अर्धी पिकपिकी जी खरं तर फ्रेमच्या मागे असायची, फक्त आपल्याला नाही दिसायची तिला शोधायला दुसऱया रूममध्ये जायचा. मग या रूममधून दुसऱया रूममध्ये ती पूर्ण बाहेर (फ्रेमच्या) दिसेपर्यंत धावत राहायचा. इतकं हसू यायचं. बापरे…
आणि हा अत्यंत डांबरट मुलगा… बेडरूममध्ये एका लोफ्टवर बसून राहायचा आणि घरी आलेले पाहुणे त्याला आवडले नाहीत तर बाहेरच यायचा नाही. पण ते पाहुणे बेडवर जाऊन बसले की भस्सकन त्यांच्या अंगावर उडी मारायचा. असा हा माझा मस्तीखोर, डांबरट, आगाऊ, पण अत्यंत प्रेमळ पहिला फरी पार्टनर…
मग बरीच वर्षे फक्त फॉस्टर करण्यासाठी डॉग्स, कॅट्स, उंदीर, खार, पक्षी काय काय घरी येत राहिलं. असंच एक स्ट्राँग कनेक्शन निर्माण झालं होतं टायगरशी… अत्यंत स्ट्राँग बर्नाड जातीचा हा कुत्रा… हॉस्पिटलमध्ये सतत व्हिजीट असतातच आमच्या. तर हा एकच कुत्रा तिथं पडलेला असायचा. येऊन तो आमचा आहे म्हणायचा. नीट उपचार होत नव्हते. त्याला फिट्स (आकडय़ा) यायच्या सतत. बलाढय़ शरीर असलं तरी आत्मा हरवलाय याचा असं सतत वाटायचं. मग रोज येऊन मैत्री झाली. औषधांवर लक्ष ठेवायला लागले. खरं तर 8 फुटांवर असणाऱया वस्तू, व्यक्तीचा वास ओळखणारी ही अत्यंत हुशार जमात. पण कुठल्याच वासावर रिऍक्ट होत नव्हता. रोज एका फुलाचा वास मी त्याला द्यायचे. खूप दिवसांनंतर रस्त्यावर वॉक करताना रस्त्यावरच्या एका फुलाचा वास त्याने घेतला आणि सहमतीसाठी माझ्याकडे बघितलं. ‘हेच ना ते?’ त्याक्षणी आतून वाटलं त्याचा आत्मा परत आला… काही व्यक्तींना त्याच्या मालकाने सांभाळायला अपॉइंट केलं होतं. मढय़ावरचं लोणी खाणारी नालायक जमात… महिन्याकाठी त्याच्या उपचारासाठी दिलेला 90 टक्के पैसा स्वतः वापरायचे आणि बेवारस शिक्का लागू नये म्हणून 29व्या दिवशी घरी न्यायचे. 3 दिवस ठेवून परत आणायचे. मालकाला सततच्या फिरतीमुळे ही कल्पनाच नव्हती. अस्वस्थ होऊन ‘मी जातोय मला घेऊन जा’ असं सांगणारा तो समोर आला. एक दिवस आणि मालकाच्या संमतीने घरी घेऊन आले. दर पाचव्या दिवशी आकडय़ा येणाऱया टायगरला हळूहळू फक्त अमावस्या आणि पौर्णिमेच्या सुमारास फिट्स यायला लागल्या… आणि नंतर नंतर तर फक्त दिवाळीत फटाके वाजल्यावर आली तर एखादी फिट यायची. बाकी अखंड नॉर्मल असायचा. प्रेम, सकारात्मकता, आनंद आणि 100 टक्के सच्चेपणा… त्याने जगातला कुठलाही आजार बरा होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण… 15 वर्षे जगला. शांतपणे. त्याच्या त्याच्या पूजारूममध्ये.. एकदाच फक्त मिश्तीवर भुंकला. मिश्ती माझी अजून एक बेबी… कॉकर्स पॅनिअल… एकमेव विकत आणलेली पेडीग्री बच्चा… तिच्याबरोबरच गोली, नून, शिवम, माही, चिको अशा मांजरीही आहेत घरात. आनंदात एकत्र वास्तव्य करणाऱया… मैत्रिणीबरोबर ब्रीडरकडे गेले असताना धावत येऊन पिलू चाटायला लागलं. त्याची आई जणू त्याच्यामागून आली आणि म्हणाली, तू घेऊन जा हिला. आज 11 वर्षे झाली. टायगर आणि मिश्तीचंही छान जमलं… तो गेला तेव्हा डिस्टर्ब होती बरेच दिवस. शेवटचे काही दिवस आजारी असणारा टायगर मांडीवर डोकं ठेवून शेवटच्या प्रवासाला लागला, पण श्वास सोडत नव्हता. याच्या पायाला बांधलेला रक्षाकवच जाळण्याचा प्रयत्न केला तर जळत नव्हतं. रात्री उशीरा माझा नवरा घरी आला. त्याच्या मांडीवर कूस बदलायला म्हणून गेलो तर शांतपणे प्राण सोडला आणि रक्षाकवच जळालं.
खूप खूप प्रसंग आहेत गं असे आयुष्यात… प्राण्यांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद साधताना, त्यांच्या जवळ जाऊन त्यांचं संगोपन करतानाचे… डॉक्टरांना म्हणजे बऱयाचशा संशोधकांना, तज्ञांना हे कम्युनिकेशन फोल वाटतं. त्यांचा विश्वास बसत नाही, पण आज जेव्हा स्पिरीट टू स्पिरीट, सोल टू सोल कनेक्ट होऊन आम्ही बोलतो ना, खरं तर संवाद साधतो ना तेव्हा हेलावून टाकणारी सत्य समोर येतात.
असाच संवाद… मरणोत्तर संवाद आम्ही ‘अवनी’शी साधला. अवनी… हो ही तीच जब्बर वाघीण, जी जंगलची राणी म्हणून सुखात नांदत होती. ही तीच वाघीण जी म्हणे काही कारण नसताना मनुष्य प्राण्यांच्या जीवासाठी धोकादायक होती.. मूर्ख आहोत का आपण? का म्हणून कुणी मज्जा वाटली, मूड आला म्हणून आपल्यावर अटॅक करेल… जंगलांवर… त्यांच्या क्षेत्रफळावर आपण अटॅक करतोय… अतिक्रमण करतोय… पण ती सांगणार कशी… कुणाला…
अवनीशी बोलले तेव्हा ती म्हणाली, ‘हे आमचं जग खूपच सुंदर होतं. माझ्या मुलांना ते शोधताहेत… माझ्या मुलांना शोधताहेत… ते माझ्या मुलांना शोधताहेत… मी खूप थकलेय. मला खूप भूक लागलीये. माझ्या मुलांना भूक लागलीये… मी चिडले नाहीये, मी थकलेय… माझ्या मुलांना वाचव. मी इथेच आहे पण मुलं दिसत नाहीयेत माझी मला… तू शोध… आम्ही सगळे परतीच्या प्रवासासाठी रेडी झालोय. आम्ही म्हणजे सगळे वन्य प्राणी. पूर्वी आमचं जग खूप सुंदर होतं. आता नाही… आम्ही सगळे परतीच्या प्रवासासाठी सज्ज आहबोत… वर्तुळ… चक्र पूर्ण होणार आहे अनू… मी लवकरच तुला भेटेन…’ -अवनी.
मी सुन्न… आणि नंतर बोलूया म्हणून फोन कट केला.. विचार करा आणि अवनी मुव्हमेंटमध्ये सहभागी व्हा.
























































