जनगणनेला आता लोकसभेच्या निवडणुकीनंतरच मुहूर्त, डिजिटल पद्धतीने माहिती गोळा करणार

दोन वर्षांपासून रखडलेल्या देशाच्या जनगणनेला आता लोकसभा निवडणुकीनंतरच मुहूर्त असणार आहे. लोकसभेच्या निवडणुका 2024 मध्ये एप्रिल-मे महिन्यात होणार आहेत. त्याआधी कर्मचाऱ्यांना मतदार याद्या अद्यावत करायच्या आहेत. त्यामुळे त्याआधी जनगणनेचे काम सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यापुढे जनगणनेचे काम डिजिटल पद्धतीने होणार असून त्यामध्ये लोकांना वेगवेगळय़ा प्रकराचे 31 प्रश्न विचारले जाणार आहेत.

देशाची जनगणना 2021 मध्ये होणार होती, मात्र कोरोना महामारीमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता कोरोना महामारी कमी झाली असली तरी सरकारने अद्याप जनगणनेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे ती लोकसभा निवडणुकीनंतरच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या जनगणनेत घरामध्ये टेलिपह्न लाइन आहे की नाही, इंटरनेट कनेक्शन आहे की नाही, मोबाईल किंवा स्मार्टपह्न आहे की नाही, वाहन काय आहे, घराची स्थिती कशी आहे, घरात एकूण किती लोक राहतात, कुटुंबप्रमुख महिला आहे का, अशाप्रकारचे 31 प्रश्न विचारले जातील अशी माहिती रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने दिली आहे.

पहिली डिजिटल जनगणना

21 व्या शतकातील ही पहिली जनगणना आहे. ती जेव्हा होईल तेव्हा डिजिटल पद्धतीनेच होणार आहे. यामध्ये लोकांना स्वतःची माहिती भरण्याची संधी मिळणार आहे. सरकारी कर्मचार्यांऐवजी ज्यांना जनगणना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी एनपीआर अनिवार्य केले जाणार आहे. त्यासाठी लोकांना त्यांचा आधार आणि मोबाईल क्रमांक देणे आवश्यक असेल.

नवीन जिल्हे निर्माण करण्याची मुदत वाढवली

जानेवारी 2023 मध्ये हिंदुस्थानचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी प्रशासकीय सीमांचे स्थिरीकरण, नवीन जिल्हे किंवा उपजिल्हे निर्माण करण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढवली आहे.