केंद्रीय पथकाकडून अमरावतीतील शेती नुकसानाची पाहणी, विभागाला 1804 कोटीची आवश्यकता

690

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अमरावती विभागातील शेतकर्‍यांना 1804 कोटीची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष केंद्रीय समितीने काढला आहे. पथकाचे सदस्य तथा केंद्रीय कापूस विकास संचालक डॉ. आर.पी. सिंह यांनी शुक्रवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पाहणी केली.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. या पाहणी दौ-यात नांदगाव खंडेश्वर, दाभा, जळू, माहुली चोर, धानोरा गुरव आदी गावांना भेटी देऊन तेथील शेतकरी बांधवांशी संवाद साधला व शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी केली. दाभा येथे डॉ. सिंह यांनी एकनाथ ग्रेसपुंजे, मारोतराव वाठ आदी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिपावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय, कपाशीची फुले गळणे, बोंड सडणे असे प्रकार घडले. गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या बोंडांची संख्या घटली, असे शेतकरी बांधवांनी यावेळी सांगितले. सतत पावसामुळे पहिली वेचणी वाया गेली असून, गतवर्षीच्या तुलनेत वेचण्यांची संख्याही कमी झाल्याचे डॉ. देशमुख यांनी यावेळी नोंदवले.

त्यानंतर पथकाने जळू येथील शेतकरी संजय भाकरे यांच्या शेतात भेट देऊन कपाशीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पंचनामा अहवाल मागवून त्याची नोंदही घेतली. त्यांनी माहुली चोर येथील शेतकरी बाबाराव डोंगरे व धानोरा गुरव येथील शेतकरी मनोज चव्हाण यांच्याशी चर्चा करून सोयाबीन पिकाच्या नुकसानाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी धानोरा गुरव येथील आंजनेय लोखंडे यांच्या शेतात भेट देऊन कपाशीची पाहणी केली. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर या पीकांचे मोठे नुकसान झाले असून, मदतीसाठी 298 कोटी 91 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे प्रशासनातर्फे पथकाला सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या