
अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर सर्वसामान्य भक्तांच्या कमाईतूनच व्हावे, सरकारी पैशाने नको या देश-विदेशातील कोटय़वधी रामभक्तांच्या भावनेचा आदर राखत आज केंद्र सरकारने राममंदिराच्या उभारणीसाठी ‘शगुन’ म्हणून 1 रुपयाचा निधी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला हस्तांतरित केला. लवकरच अयोध्येत रामल्लाच्या जन्मभूमीत भव्यदिव्य राममंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल, असे राममंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अवघ्या हिंदुस्थानवासीयांसाठी पवित्र असलेल्या अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर व्हावे हे कोटय़वधी रामभक्तांचे स्वप्न आहे. मात्र मंदिर शासकीय अथवा सरकारी पैशातून नको, जनताजनार्दनाने दिलेल्या दानातून ते उभे राहावे अशी साधुसंत आणि सामान्य रामभक्तांची इच्छा आहे. त्यानुसारच आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे अवर सचिव डी. मुर्मू यांनी 1 रुपयांची राशी राममंदिर ट्रस्टला सुपूर्द केली. आता सरकारकडून शगुन झाल्यावर ट्रस्टला मंदिर उभारण्यासाठी भक्त आणि भाविकांकडून देणग्या, अनुदान आणि भेटींच्या स्वरूपात निधी जमवता येणार आहे. कोणतीही व्यक्ती अथवा संस्था प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील मंदिरासाठी विनाशर्त रोख रक्कम, दागिने अथवा आपल्या अचल मालमत्तेचे दान करू शकेल, असे ट्रस्टने जाहीर केले आहे.
राममंदिर ट्रस्टचे नोंदणीकृत कार्यालय असेल दिल्लीच्या ग्रेटर कैलाश भागात
केंद्राने अयोध्येतील राममंदिर उभारणीसाठी 15 सदस्यीय ट्रस्टची घोषणा केली. या ट्रस्टमध्ये संतमहंतांसह मान्यवर सरकारी अधिकारी, वकील आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. या ट्रस्टला कायमस्वरूपी नोंदणीकृत कार्यालय दिल्लीच्या ग्रेटर कैलाश या भागात दिले जाणार आहे. सध्या जेष्ठ कायदेतज्ञ आणि ट्रस्टचे विश्वस्त के. पराशरण यांच्या निवासस्थानातून ट्रस्टचा कारभार चालवला जाणार आहे.
मी रामलल्लाचा सेवक, मला पदाची अपेक्षा नाही -राम विलास वेदांती
मी रामलल्लाचा सच्चा सेवक आहे. अयोध्येत भव्य राममंदिर व्हावे हीच माझी इच्छा आहे. मला राममंदिर ट्रस्टवर घेतले नाही याचे मुळीच दुःख नाही. मंदिरासाठी माझे पार्थिवही कामाला यावे हेच माझे आयुष्याचे ध्येय आहे, असे स्पष्टीकरण रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य राम विलास वेदांती यांनी केले आहे.



























































