
तोटय़ात असलेल्या सरकारी दूरसंचार कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने दिला आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने (DOT) अर्थ मंत्रालयाकडे या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी 74 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची मागणी केली होती. मात्र अर्थ मंत्रालयाने ही मागणी फेटाळत या कंपन्यांमधील कर्मचाऱयांना सक्तीने घरी पाठविण्याचा सल्ला दिला आहे.
बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्या जर बंद केल्या तर सरकारला 95 हजार कोटी रुपयांची गरज भासणार आहे. या रकमेत दोन्ही कंपन्यांमधील सुमारे 1 लाख 6 हजार कर्मचाऱयांसाठी सक्तीची निवृत्ती योजना राबवावी लागणार आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलमध्ये तीन प्रकारचे कर्मचारी असून यांपैकी काही कर्मचाऱयांना सक्तीची निवृत्ती द्यावी लागणार आहे. या कर्मचाऱयांना निवृत्ती वेतन देण्यासाठी सरकारला पैशांची गरज भासणार आहे.
‘बीएसएनएल’ आणि ‘एमटीएनएल’मधील कर्मचाऱयांचे प्रकार
– कंपनीद्वारे थेट नियुक्ती मिळालेले.
– अन्य सार्वजनिक कंपन्या, विभागातून बदली मिळालेले.
– इंडियन टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसमधील कर्मचारी.
यांना सक्तीची निवृत्ती
बीएसएनएल आणि एमटीएनएलमधून थेट नियुक्ती मिळालेल्या दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱयांना सक्तीची निवृत्ती मिळू शकते. या कर्मचाऱयांचा पगार कमी असेल तसेच पूर्ण कर्मचारी वर्गात या कर्मचाऱयांचे प्रमाण 10 टक्के असेल अशा कर्मचाऱयांना सक्तीची निवृत्ती मिळण्याची शक्यता आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील आयटीएस अधिकाऱयांना अन्य सरकारी कंपन्यांमध्ये नियुक्ती मिळू शकते.



























































