सीमेवरील जवानांचे भत्ते देण्यासाठीही केंद्र सरकारकडे पैसे नाहीत

988

आर्थिक मंदीचा फटका लष्कर, निमलष्करी जवानांनाही बसला आहे. देशाच्या सीमांचे अहोरात्र संरक्षण करणाऱया सशस्त्र सीमा बलच्या 90 हजारांवर जवानांचे भत्ते देण्यासाठी केंद्र सरकारकडे पैसे नाहीत. दोन महिन्यांपासून वेतनाबरोबर मिळणारे भत्ते जवानांना मिळाले नाहीत.

यासंदर्भात ‘टेलिग्राम’ दैनिकाने वृत्त दिले आहे. सशस्त्र सीमा बलमध्ये 94261 जवान आहेत. जम्मू-कश्मीरसह नेपाळ आणि भूतानच्या 2450 किमी लांब सीमांचे संरक्षण हे जवान करीत आहेत. आसाममधील बोडो अतिरेकी, विविध राज्यांमधील माओवादी-नक्षलवादी परिसरात हे जवान तैनात आहेत. अहोरात्र देशसेवा बजावणाऱया या जवानांना मात्र वेतनाबरोबर भत्ते देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. लिव्ह ट्रव्हल कन्सेशन (एलटीसी), मुलांच्या शिक्षणासाठीचा भत्ता (सीए), एसीपी आदी भत्ते दोन महिन्यांपासून जवानांना देण्यात आलेले नाहीत. दरम्यान, दोन महिन्यांचे केवळ वेतन देण्याइतकाच निधी सशस्त्र सीमा बलाकडे उपलब्ध आहे. इतर भत्ते देण्याइतके पैसे नाहीत, असेही या वृत्तात म्हटले आहे.

चार महिन्यांत दुसरी वेळ

जवानांचे भत्ते रोखण्याची चार महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. सप्टेंबर 2019 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तीन लाख जवानांचा रेशन भत्ता पैसे नसल्याने गृह मंत्रालयाने रोखला होता. प्रत्येक जवानाला प्रति महिना 3600 रुपयांचा रेशन भत्ता दिला जातो. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्र सरकार जागे झाले आणि हा भत्ता देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या