केंद्र सरकारच्या निर्दशांचे पालन करुन शिक्षकाना घरातुन काम करण्यास सांगावे – दिगंबर कामत

गोव्यातील प्रत्येक तालुका इंट्रानेट नेटवर्कने जोडला आहे. मी मुख्यमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यानी गोव्यात इंट्रानेटचा पायलट प्रोजेक्ट राबवला होता. आज सदर सुविधेचा वापर ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारने करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी केली आहे.

केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाने ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षकाना घरातुनच काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने त्वरीत याची दखल घेऊन, शिक्षकाना शाळा-कॉलेजात हजेरी लावण्याचे दिलेले आदेश मागे घ्यावेत अशी मागणी कामत यांनी केली आहे. सरकारने ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेसाठी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. शिक्षक तसेच विद्यार्थ्याना लागणारी उपकरणे देण्यासाठी खास योजना त्वरीत जाहिर करावी, असे कामत म्हणाले.

सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीचा अभ्यासक्रम त्वरीत जाहिर करणे गरजेचे आहे. बोर्ड ऑफ स्टडिजने सरकारला अभ्यासक्रमासबंधी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास सरकार का टाळाटाळ करते असा सवाल कामत यानी केला आहे. गोव्यातील प्रत्येक तालुक्यात व बहुतेक पंचायती पर्यंत इंट्रानेट सुविधा पोचली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी त्याचा वापर होऊ शकतो. सदर सुविधेत विनाव्यत्यय सिग्नल उपलब्ध होतो व चांगल्या दर्जाचे व्हिडीओ प्रसारण होते असे कामत यानी सांगीतले आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत कार्यालयात बसुन सदर इंट्रानेट सुविधेद्वारे विवीध तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होतो याची आठवण कामत यानी करुन दिली आहे. मोबाईल नेटवर्कपेक्षा इंट्रानेट सुविधा जास्त प्रभावी आहे. भूमिगत फायबर ऑप्टीक केबलद्वारे विणलेल्या जाळ्यामुळे सिग्नल न मिळणे वा व्यत्यय येणे असे अडथळे येत नाहीत असे कामत यानी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या