मध्य रेल्वेला चोरांचा विळखा! तीन वर्षांत वेगवेगळ्या वस्तूंच्या चोरीच्या 1752 प्रकरणांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेला चोरांचा विळखा पडल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांत वेगवेगळय़ा ठिकाणी रेल्वेच्या वस्तूंची चोरी झाल्याची 1752 तक्रारी नोंदल्या असून त्यापैकी 1190 प्रकरणांचा आरपीएफने छडा लावला आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी रेल्वेच्या मालमत्तेची काळजी घ्यावी म्हणून ‘रेल्वे की संपत्ती आपकी हैं,’ अशी सातत्याने उद्घोषणा केली जाते. त्याचा चोरटय़ांनी भलताच अर्थ घेतल्याचे दिसत असून त्यांनी गेल्या तीन वर्षांत अनेक ठिकाणी रेल्वेच्या आवारात पडलेले रूळ, ओव्हरहेड वायर, तांब्याच्या वायर आणि इतर मालमत्तेवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रेल्वेने तक्रार दाखल केल्यानंतर आरपीएफने तपास करत 1190 प्रकरणांची उकल करत चोरीस गेलेली मालमत्ता परत मिळवली आहे. दरम्यान, रेल्वेचे चोरीस गेलेले साहित्य परत मिळवण्यासाठी आरपीएफने ‘रेल्वे सुरक्षा’ ही मोहीम राबवत संबंधित गुन्हे उघडकीस आणले आहेत.

एका महिन्यात 66 घटना
जुलै महिन्यात मध्य रेल्वेच्या मालमत्ता चोरीच्या 66 घटना घडल्या आहेत. त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरपीएफने 41 घटना उघडकीस आणत 90 जणांना अटक केली आहे.