
मध्य रेल्वेने मेल-एक्स्प्रेसच्या जनरल डब्यांमध्ये घुसण्यासाठी होणारी ‘हमरीतुमरी’ रोखण्यासाठी अंगठय़ाच्या ठशावर आधारित ‘बायोमेट्रिक कुपन’ प्रवेश योजना आखली होती. उत्तरेकडे जाणाऱया गाडय़ांच्या जनरल डब्यांच्या प्रवेशासाठी ही योजना सुरूही करण्यात आली होती, परंतु दिवाळीच्या सुट्टीत जाणाऱया प्रवाशांच्या गर्दीपुढे ही योजना फेल ठरल्याचे बोलले जात आहे. एक हजार प्रवाशांपेक्षा जास्त प्रवास असल्यास ही योजना काम करीत नसल्याचे म्हटले जात आहे.
मध्य रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱया प्रवाशांना शिस्तीने प्रवेश मिळावा, त्यात वशिलेबाजी होऊ नये यासाठी जनरल तिकीटधारी प्रवाशांना बायोमेट्रिक कुपन देण्याचा निर्णय घेतला होता. या हायटेक ‘बायोमेट्रिक कुपन’ प्रवेश योजनेमुळे प्रवाशांच्या अंगठय़ाचे ठसे घेऊन त्यांना प्रवेश कुपन देण्यात येणार होते. त्यानंतर क्रमांकांनुसार शिस्तीने जनरल प्रवाशांना डब्यात रांगेने प्रवेश देण्याची योजना होती. मध्य रेल्वेच्या उत्तरेकडे जाणाऱया महानगरी एक्स्प्रेस, तसेच हावडा आणि अन्य गाडय़ांमध्ये प्रायोगिक स्वरूपात योजनेला सुरुवात केली होती.
बायोमेट्रिक कुपन कसे आहे
प्रवासाच्या आदल्या दिवशी ही बायोमेट्रिक टोकन वाटली जातील. त्यानंतर दुसऱया दिवशी गाडी सुटण्याच्या एक तास आधी टोकनप्रमाणे प्रवाशांना रांगेने डब्यात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे आसन पकडण्यासाठी होणारी झटापट तसेच वशिलेबाजीलाही आळा बसणार आहे.
तांत्रिक कारणाने योजना बंद
मध्य रेल्वेने सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱया उत्तरेकडील गाडय़ांसाठी सुरुवातीला बायोमेट्रिकने प्रवेश देणे सुरू केले होते, परंतु सध्या तांत्रिक कारणांमुळे ही योजना बंद असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अशरफ यांनी सांगितले.
असामाजिक तत्त्वांनाही आळा बसणार
मध्य रेल्वेची तर प्रवासी आरक्षण (पीआरएस)केंद्रांवरही आरक्षित तिकीट काढणाऱयांचे अंगठय़ाचे ठसे आणि इतर माहिती घेऊन त्यांचा डाटा संग्रही ठेवण्याची योजना आहे. सीएसएमटीच्या ‘पीआरएस’ केंद्रातही दोन बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहेत. जनरल प्रवाशांची माहिती ठेवणारी सध्या कोणतीही यंत्रणा नाही. या बायोमेट्रिक टोकनवर प्रवाशाचा फोटो आयडी क्रमांक व प्रवासाची माहितीदेखील असल्याने दलाल तसेच असामाजिक तत्त्वांना आळा बसणार आहे. तसेच रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांना गुंगी आणून लुटण्याच्या प्रकारांनाही आळा बसणार आहे.






















































