
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने गुरुवारी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना लेटमार्क बसला. सकाळी 6 च्या सुमारास दादर येथे सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने दादरच्या फलाट क्र. 2 आणि 5 वरून सुटणाऱया लोकल विस्कळीत झाल्या.
सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही लोकल दिवसभर उशिराने धावत होत्या. त्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या लोकल सेवांचा बोजवारा उडाल्याने कामावर जाणाऱया प्रवाशांना फटका बसला. या घटनेमुळे मुंबईतून जाणाऱया आणि येणाऱया 16 मेल-एक्स्प्रेस आणि 174 लोकल फेऱयांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
स्वयंचलित सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने लोकल मॅन्युअल सिग्नलवर चालविण्यात आल्या. त्यामुळे अप-डाऊन लोकलचा वेग कमी झाल्याने लोकलच्या एकामागोमाग रांगा लागल्या.
सिग्नल बिघाड दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी सकाळचे 8.30 वाजले. मात्र त्यानंतरही लोकल विलंबाने धावत असल्याने दादरवरून सुटणाऱया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या. लोकलबरोबरच मेल-एक्स्प्रेसला फटका बसला. 36 लोकल रद्द आणि 138 लोकल फेऱया विलंबाने धावल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.
दादर स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन उशिराने धावत होत्या. कामावर जाण्यासाठी विलंब झाल्याने दादर रेल्वे स्थानकाबाहेर टॅक्सी तसेच बस मिळण्यासाठी चाकरमान्यांनी अशी गर्दी केली.





















































