मध्य रेल्वेची तिजोरी मालामाल, भंगार विक्रीतून 404 कोटींची विक्रमी कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे 2025- 2026 या वर्षात मालामाल झाली आहे. या वर्षात मध्य रेल्वेने भंगार विक्री करून जबरदस्त कामगिरी केली आहे. अहवालानुसार, 2025-26 या वर्षात भंगार विक्रीत 404.72 कोटींचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षी रेल्वेच्या तिजोरीत 393.65 कोटी रुपये जमा झाले होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.81 टक्क्यांनी वाढ झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून शून्य भंगार मोहिम राबवली जात असून मध्य रेल्वेने यंदाच्या वर्षी भंगार विक्रीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या मोहिमेत रेल्वेच्या कार्यशाळा, यार्ड आणि विभागांमध्ये वापरात नसलेल्या साहित्याचे वर्गीकरण करून त्याचे भंगार विक्रीत रूपांतर करण्यात आले. यामुळे महसूलात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या मोहिमेत कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यांसह सर्व पाच विभागांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली. दुर्गम आणि विखुरलेल्या ठिकाणांहून जुने भंगार हटवल्यामुळे लिलावात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली आणि परिणामी विक्रीतून अधिक मूल्य प्राप्त झाले, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मध्य रेल्वेने विक्री केलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणावर रेल्वे मार्गाशी संबंधित जुने रुळ व इतर ट्रॅक साहित्याचा समावेश होता. तसेच या प्रक्रियेत जमा झालेल्या लोखंडी आणि लोखंडी धातूंच्या भंगाराचाही यात समावेश होता. याशिवाय सेवा पूर्ण केलेली इंजिने, प्रवासी डबे आणि मालवाहू डबे विकण्यात आले. मध्य रेल्वेने आपले आर्थिक नियोजन आणि कार्यक्षम व्यवस्थापन सिद्ध केले असून, संपूर्ण नेटवर्कमध्ये ‘झिरो स्क्रॅप’ (शून्य भंगार) स्थिती साध्य करण्यासाठी अशा विशेष मोहिमा भविष्यातही सुरू ठेवण्याचा निर्धार रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.