मध्य रेल्वेच्या लेडीज स्पेशलची 30 वर्षे!

लोकलमध्ये सीट पकडण्याच्या उद्देशाने पुरुष प्रवासी फिल्डींग लावून असतात, परंतु अचानक ‘महिला स्पेशल’ आली की पुरुषांच्या तोंडातून अरेरे.. लेडीज स्पेशल है.. असे उद्गार निघतात. परंतु काही पुरुष प्रवाशांच्या लक्षात न आल्याने ते या गाडीत जागा पकण्यासाठी चढतात, तेव्हा सर्वजण त्याचा उद्धार करतात..अरे नया है क्या..असे म्हणत शेरेबाजी केली जाते…आणि वरमलेला प्रवासी खजिल होत चूपचाप डब्यातून उतरत असतो. अशा या पुरुष प्रवाशांना जळवणाऱया मध्य रेल्वेच्या ‘लेडीज स्पेशल’ला शुक्रवारी 30 वर्षे पूर्ण झालीत.

मध्य रेल्वेवर 30 वर्षापूर्वी महिलांसाठी ‘महिला स्पेशल’ लोकल सुरू झाल्याने पिकअवरमध्ये महिला प्रवासी सध्या आरामात प्रवास करीत आहेत. सध्या मध्य रेल्वेवर चार महिला स्पेशल लोकल ट्रेन धावत असून दोन हार्बरवर तर दोन मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावत आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 1 जुलै 1992 रोजी पहिली ‘महिला स्पेशल’ लोकल धावली होती. तिला आज 30 वर्षे पूर्ण झाल्याने मध्य रेल्वेने विशेष पोस्टर करून समाजमाध्यमावर ट्वीट केले आहे.

सध्या मध्य रेल्वेवर एकूण चार संपूर्ण महिला स्पेशल लोकल चालविण्यात येत आहेत. तसेच 21 लोकल फेऱयांचे पिकअवरमधले पहिले तीन डबे महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या पिकअवरमधला महिलांचा प्रवास अधिक सोयीस्कर होतो.

जलद नको, धिमी हवी …

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या अभ्यासानुसार मुंबईत कामावर जाणाऱया महिलांची संख्या देशात सर्वाधिक आहे. शहरातून आणि उपनगरातून 6.5 लाख महिला कामावर जातात. जलद लोकलमधून प्रवास करणाऱयांमध्ये 77 टक्के पुरुष तर 23 टक्के महिला प्रवासी आहेत. हार्बर लाइनवर पुरुषांच्या तुलनेत 21 टक्के महिला तर ट्रान्स हार्बरवर 22 टक्के महिला प्रवासी असतात. पुरुष प्रवाशांचा कल जलद लोकल पकडण्याकडे असतो तर महिला त्या तुलनेत धिम्या लोकलना प्राधान्य देतात असे विलबर स्मिथ यांची आकडेवारी सांगते.