लोकल प्रवाशांचे हाल मध्य रेल्वेला दिसेनात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकर जीव मुठीत धरून दाटीवाटीने लोकल प्रवास करतात. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी लोकल फेऱया वाढवाव्यात अशी मागणी केल्यास मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात नव्या लोकलसाठी जागाच नसल्याचे गेल्या आठ वर्षापासून रेल्वेकडून सांगितले जात आहे. मात्र एकामागोमाग एक वंदे भारत ट्रेन याच मार्गावर सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे उपनगरीय प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून रेल्वेला लोकल प्रवाशांचे हाल दिसत नाहीत का खरमरीत सवाल रेल्वे बोर्डाला केला आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दररोज 45 लाख प्रवासी ये-जा करतात. त्यासाठी रेल्वेकडून 1810 फेऱया चालवल्या जात असल्या तरी लोकलला होणारी प्रचंड गर्दी पाहता लोकल सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकलची संख्या वाढवावी म्हणून उपनगरीय प्रवासी संघटनांकडून सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र सध्याच्या वेळापत्रकात लोकल गाडय़ांना जागा नसल्याचे आणि रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार त्या वाढवणे शक्य नसल्याचे टुकार कारण दिले जात आहे. मात्र गेल्या दीड वर्षात रेल्वेने याच मार्गावर चार वंदे भारत ट्रेन सुरू केल्या आहे. रेल्वे प्रशासन आतापर्यंत लोकल फेऱया वाढवण्यासाठी वेळापत्रका जागा नाहीत म्हणत होते, मग प्रिमियम गाडय़ांसाठी वेळ कशी मिळते अशी विचारणा रेल्वे बोर्डाला केली.

वर्षाला सातशे-आठशे प्रवाशांचा गाडीतून पडून मृत्यू
लोकलमध्ये सकाळी आणि सायंकाळीच्या वेळी मोठया प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अनेकदा प्रवासी गाडीतून पडून मृत्यू होतो. गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहता वर्षाला सरासरी सातशे-आठशे लोकल प्रवाशांचा गाडीतून पडल्याने मृत्यू होत आहे. त्यामुळे लोकलची संख्या वाढवल्यास प्रवाशांचे जाणारे बळी कमी होऊ शकणार आहेत.