
केंद्र सरकारचा कंपन्यांच्या खासगीकरणाचा सपाटा सुरूच असून एलआयसीनंतर आता आयडीबीआयच्या खासगीकरणाला वेग आला असून मे 2022 पर्यंत बाजारमूल्य ठरल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहेत. दरम्यान, खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आयडीबीआयच्या शेअर्समध्ये वाढ होऊ लागली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी 2021 च्या अर्थसंकल्पात आयडीबीआय बँकेसह आणखी दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. पण, कोरोनामुळे ही खासगीकरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. आता ही प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, ही माहिती समोर येताच बँकेच्या शेअर्समध्ये वाढ व्हायला लागली आहे. आज बँकेच्या शेअर्समध्ये 7.85 टक्क्यांनी वाढ झाली असून एका शेअर्सची किंमत 48.75 रुपयांवर पोहोचली आहे.
मे महिन्यात बाजारमूल्य ठरणार
देशात कोरोना नियंत्रणात असल्यामुळे 2021 मध्ये घेतलेल्या निर्णयांना गती देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळेच आता आयडीबीआय बँकेच्या खासगीकरण्याची प्रक्रिया केव्हाही सुरू होऊ शकते. सरकारला चांगल्या किमतीवर ही बँक विकायची आहे. त्यामुळे आतापासूनच बँकेचे बाजार मूल्य ठरवण्यावर भर दिला जात आहे. हे बाजारमूल्य ठरले की, सरकार मे महिन्यात बोली लावण्याची शक्यता आहे.
एलआयसीची हिस्सेदारी विक्री संचालक मंडळ ठरवणार
सध्या आयडीबीआय बँकेत सरकारचा 45.48 टक्के आणि एलआयसीचा 49.24 टक्के वाटा आहे. सरकार आयडीबीय बँकेतील आपला संपूर्ण 45.48 टक्के वाटा विकण्याच्या तयारीत आहे. एलआयसीच्या संचालक मंडळाने एक प्रस्ताव पास केला आहे, ज्यानुसार तेदेखील बँकेतील आपला वाटा कमी करू शकतात. परंतु, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी यात काही बदल केले जाऊ शकतात.



























































