हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद होणार दुप्पट होणार, ९७ स्वदेशी लढाऊ विमानांच्या खरेदीला केंद्राने दिली मंजुरी

हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद दुप्पट होणार आहे. केंद्र सरकारने हिंदुस्थानी वायुसेनेसाठी 97 LCA (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) मार्क 1A लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. या 62,000 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाला मंगळवारी उच्चस्तरीय बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली. यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) या विमानांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही LCA मार्क 1A विमानांची दुसरी मोठी ऑर्डर आहे. यापूर्वी सरकारने 2021 मध्ये 48,000 कोटी रुपये किमतीच्या 83 विमानांची ऑर्डर दिली होती. नवीन ऑर्डरमुळे हिंदुस्थानी वायुसेना आपल्या जुन्या मिग-21 विमानांचा ताफा, जो पुढील काही आठवड्यांत सेवेतून बाहेर होणार आहे, त्याची जागा घेण्यास सक्षम होईल.

LCA मार्क 1A ही तेजस विमानाचे अपडेटेड मॉडेल आहे. ज्यामध्ये यापूर्वीच्या 40 LCA विमानांच्या तुलनेत अधिक प्रगत एव्हियोनिक्स आणि रडार सिस्टीम्स आहेत. या विमानांमध्ये 65 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे हिंदुस्थानच्या एरोस्पेस क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित होते.