
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई ठाणे आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर आता या प्रकल्पाला वेग येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 717 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. जहाज वाहतूक मंत्रालयाने गुरुवारी या प्रकल्पाला मंजुरी देत 93 किलोमीटर लांबीच्या या मार्गाबाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश मंत्रालयाने ठाणे महापालिकेला दिले आहेत.
नवी दिल्लीत पालिका अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाबाबतची माहिती जहाज वाहतूक राज्यमंत्री मनसुख माधविया यांना दिली. त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. रेल्वे आणि रस्ते मार्गावरचा ताण कमी करण्यासाठी जलमार्गाचा पर्याय उपयुक्त ठरणार असून यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल असे शिवसेनेचे कल्याणमधील खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ते या बैठीकीला उपस्थित होते. या जलमार्गावर 18 ठिकाणी थांबे असतील. ठाणे नवी मुंबई मार्गावर साकेत, कळवा, विटावा, मीठ बंदर, एरोली, वाशी, नेरुळ, बेलापूर, तळोजा, जुईगाव, पनवेल, जेएनपीटी आणि मोरा हे थांबे असतील. तर ठाणे- मुंबई जलमार्गावर साकेत ते वाशीपर्यंत तेच थांबे असतील, त्यानंतर ट्रॉम्बे, इलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया हे थांबे असतील.
खाडीच्या मुखाजवळच्या भागाचे कोणतेही नुकसान न करता तंरगत्या जेट्टी उभारण्यात येणार आहेत. तर शक्य असेल त्या ठिकाणी कायमस्वरुपी जेट्टी उभारण्यात येतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पाच जेट्टी तयार असून 13 जेट्टी बांधण्यात येणार आहेत. या मार्गावरील प्रवासी संख्येचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे जेट्टीचा निर्णय घेण्यात येणार आहे. या मार्गावर सुरुवातील फक्त प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावर 250 प्रवासी क्षमता असलेल्या बोटी ठेवण्यात येणार आहे. प्रवासी संख्येनुसार बोटींच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या जलमार्गामुळे रस्ते आणि रल्वे मार्गावरील ताण कमी होणार आहे. रस्ते मार्गावरील वाहतुकीचा ताण 20 टक्क्यांनी कमी होणार आहे. तसेच रस्ते मार्गाने खर्च होणाऱ्या इंधानापेक्षा 33 टक्क्यांनी इंधनावरील खर्चात बचत होणार आहे. मात्र, या जलमार्गामुळे सागरी जैवविविधता नष्ट होण्याचा धोका आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होणार असल्याने त्यामुळे शहरात पाणी तुंबण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.





























































