केंद्राने हस्तक्षेप करून तपोवनातील वृक्षतोड थांबवावी, शिवसेनेने संसदेत उठवला आवाज

नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात शुक्रवारी शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत आवाज उठवला. केंद्राने हस्तक्षेप करून हे अठराशे वृक्ष वाचवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

साधुग्रामच्या नावाखाली महापालिकेने अठराशे झाडांची कत्तल करून माईस हे एक्झिबिशन, मीटिंग्ज सेंटर उभारण्याचा डाव रचला आहे. याविरोधात नाशिककर एकवटले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करून तपोवन वाचवण्याची मागणी केली होती. बुधवारी, 3 डिसेंबरला तपोवनात भेट देऊन पर्यावरण तज्ञांकडून माहिती घेतली. या जागेत माईस हे एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्याने तपोवनात फक्त सिमेंटचे जंगल उरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

खासदार वाजे यांनी आज शुक्रवारी लोकसभेतील शून्य प्रहरात वृक्षतोडीविरोधातील मुद्दा जोरदारपणे मांडला. नाशिकचे तपोवन केवळ वनराई नसून, प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पावन झालेला परिसर आहे, जैवविविधतेचे पेंद्र आहे, नाशिकचे फुप्फुस आहे. या पवित्र भूमीतील शेकडो झाडे तोडणे म्हणजे श्रद्धा, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा यांच्यावर उगारलेली कुऱहाड ठरेल. हे त्वरित थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली. तज्ञांचे मत जाणून न घेता परस्पर महापालिकेने घेतलेला हा निर्णय पारदर्शक नाही, असे सांगितले. ‘तपोवन नष्ट करून ‘हरितपुंभ’ कसा होणार’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.