एलएलबीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची फरफट, कट ऑफ 67 गुणांची; सीईटीतील स्कोअर 69

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलएलबी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सीईटी परीक्षेचा निकाल लागून सहा महिने उलटले तरीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची फरफट सुरू आहे. कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवूनही एका विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये प्रवेशच मिळालेला नाही. आतापर्यंत एलएलबी प्रवेशाच्या चार गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या असून गुरुवारी कॉलेज स्तरावर होणारी प्रवेश फेरीही पार पडली.

कमलेश शेठ (नाव बदललेले) या विद्यार्थ्याने एलएलबी सीईटीमध्ये 69 गुण मिळवले. त्यानंतर ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी त्याने मुंबई विद्यापीठाच्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रेही अपलोड केली, मात्र तरीदेखील कमलेश शेठ यांचा ऑनलाइन अर्ज राखून ठेवण्यात आला. दुसऱया यादीवेळीशेठ यांनी नव्याने अर्ज दाखल केला, पण या यादीतही त्यांचे नाव आले नाही. कमलेश शेठ यांनी जन्म दाखला, वडिलांचे डोमिसाईल सर्टिफिकेट, गुजराती अल्पसंख्याकचा दाखला आदी कागदपत्रे रितसर अपलोड केली असूनही त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही.

ऑनलाइन अर्जात त्यांनी नमूद केलेल्या जितेंद्र चौहान लॉ कॉलेजची कट ऑफ 67 गुणांची आहे, तर कमलेश यांना 69 गुण असूनही या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळालेला नाही. या घोळाविषयी त्यांनी सीईटी सेल आणि कॉलेजकडे संपर्क साधला असता त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली. याप्रकरणी स्टुडंट लॉ कौन्सिलच्या वतीने ऍड. सचिन पवार हे मुंबई विद्यापीठाकडे तक्रार करणार आहेत.