अतिक्रमण हटाव पथकाचे छबुलाल अभंग निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

बेकायदा बांधकामाचे जप्त केलेले साहित्य परत देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेले मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख छबुलाल अभंग यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. तब्बल दोन आठवड्यानंतर आयुक्तांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख अभंग व कंत्राटी दुय्यम आवेक्षक सचिन दुबे यांना ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ९ सप्टेंबरला मनपाच्या मुख्यालयात अटक केली होती. बीड बायपास परिसरातील शहानगर येथील एका तरुणीने या बाबत तक्रार दाखल केली होती.

या घटनेनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या कारभाराची चिरफाड करत संताप व्यक्त केला होता. महापौरांनी अभंग याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. मात्र पोलिसांचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तब्बल १४ दिवसांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मनपाला कारवाई संदर्भातील अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आज शुक्रवारी सी. एम. अभंग यांच्या निलंबनाचे आदेश काढले.