आंबिवलीच्या इराणी चोरट्याचा चार मिनिटांत ‘खेळ खल्लास, कर्नाटकातून मुसक्या आवळल्या

नागरिकांच्या सोनसाखळ्या हिसकावून फरार झालेल्या आंबिवलीच्या इराणी चोरट्याचा भिवंडी पोलिसांनी चार मिनिटांत खेळ खल्लास केला. हा चोरटा कर्नाटकातील बिदर येथे लपून बसल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा घटक दोनच्या पथकाने फिल्मीस्टाईल सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद (21) असे या चोरट्याचे नाव आहे.

भिवंडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक दोनच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रवींद पाटील, रामचंद्र जाधव व राजेश शिंदे यांच्या पथकाने शोध घेतला असता चोरटा अब्बास या गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. तो कर्नाटकातील बिदर येथे पत्नीच्या माहेरी कुलूपबंद घरात लपून बसल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बिदर येथील भल्यामोठ्या इराणी वस्तीत पहाटे सापळा रचला. पथकाने फिल्मीस्टाईलने बंद घराच्या गेटसमोर गाडी आणून उभी केली आणि घराचा कडीकोयंडा तोडून साखरझोपेत असलेल्या अब्बासला उचलून गाडीत टाकले. अब्बास हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून पोलिसांनी 20 गुन्ह्यांची उकल करत 30 लाख 22 हजार रुपये किमतीचे 232 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.

शिक्षिकेला लाखोंचा गंडा
पनवेल : आरटीओ चलनाच्या नावाखाली भामट्याने शिक्षिकेला तब्बल 23 लाख 88 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली येथील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिकेने घराच्या नूतनीकरणासाठी बँकेतून 24 लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र भामट्याने शिक्षिकेला अॅप्लिकेशन फाईल पाठवून खात्यातील सर्व रक्कम लंपास केली.

ग्राहकाने सराफाला लुटले
भिवंडी : खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानात आलेल्या ग्राहकाने सराफाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने कानातील सोन्याच्या रिंगांचा ट्रे घेऊन पोबारा केला. नारपोलीच्या भंडारी कंपाऊंड येथील नागफणी ज्वेलर्स दुकानात हा प्रकार घडला. हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.