
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
खाकी वर्दीतील मंगळसूत्र चोरटा पोलिसांच्या ताब्यात असताना आज पुन्हा हेल्मेटधारी दुचाकीस्वार चोरट्याने सिडको हद्दीत धुमाकूळ घालत एका तासात तीन महिलांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले, तर तिसरा प्रयत्न अयशस्वी झाला. मंगळसूत्र चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या दिशेने तपास सुरू केला आहे. एकापाठोपाठ तीन घटनांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेल्मेटधारी दुचाकीस्वार चोरट्यांनी आज शुक्रवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास सिडकोत धुमाकूळ घालत सिडकोतील बजरंग चौक, एम-2 आणि गोदावरी शाळेजवळून जाणाऱ्या तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले.
हडको, एम-2 भागातील ललिता विठ्ठलराव नागे (58) या सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसोबत स्वाध्यायाचा कार्यक्रम आटोपून पायी जात होत्या. पाठीमागून हेल्मेट घालून पल्सर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. यात साडेतीन तोळ्याचे गंठण आणि दीड तोळ्याचे मंगळसूत्र होते. चोरट्यांचा त्यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांच्या हातात दीड तोळयाचे मंगळसूत्र राहिले तर साडेतीन तोळयाचे गंठण हे झटापटीत खाली पडले. चोरटे हे 30 ते 35 वर्ष वयोगटातील असून, एकाच्या अंगावर शेंदरी रंगाचा शर्ट होता. त्यानंतर चोरटे बजरंग चौकाच्या दिशेने निघाले. त्यांनी पुन्हा गोदावरी शाळेजवळील एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र ही महिला ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचली नाही. तसेच घरासमोरील अंगण झाडणाऱ्या आशा देवळे या महिलेचाही चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत करून तपासाला सुरुवात केली आहे.





























































