
रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेला फ्लॅट भाड्याने मिळेल काय, अशी विचारणा करीत दुचाकीस्वार चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील 45 हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. ही घटना 30 जुलैला रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरीतील घरकुल सोसायटी समोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी 61 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ महिला सोसायटी परिसरात रस्त्याचे चालत व्यायाम करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांना परिसरात फ्लॅट भाड्याने मिळेल काय, अशी विचारणा करत त्यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील 45 हजारांचे गंठण हिसकावले आणि पोबारा केला. महिलेने आरडाओरडा करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटा पसार झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विवेक रिसाळ अधिक तपास करीत आहेत.





























































