पारनेरमधील राजे शिवाजी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक; सहा दिवसांची पोलीस कोठडी

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे मुख्य कार्यालय असलेल्या राजे शिवाजी पतसंस्थेमध्ये कर्ज प्रकरणे केलेल्या 11 कर्जदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांना पारनेर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री त्यांच्या कान्हूरपठार येथील घरातून अटक केली. पारनेर न्यायालयाने आरोपी ठुबे याला सहा दिवसांची (दि. 27 जुलैपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.

दरम्यान, पतसंस्थेत झालेल्या मोठ्या गैरव्यवहारामुळे गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम मिळणे बंद झाले आहे. सध्या संस्थेचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जात आहे. आझाद ठुबे याला अटक झाल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. तर संस्थेच्या इतर संचालकांचे धाबे दणाणले आहे.

शिवाजी रिकामे (रा. हिंगणी, श्रीगोंदे) यांच्यासह राजे शिवाजी पतसंस्थेच्या 11 कर्जदारांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. या तक्रारीची सहकार विभागाने चौकशी केल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष आझाद ठुबे यांच्यासह इतर आरोपींनी कर्जदारांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. कर्जदारांनी कर्जप्रकरणांसोबत जोडलेल्या कोऱ्या धनादेशांचा वापर फसवणुकीसाठी करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर कर्जदारांनी पतसंस्थेमध्ये कर्जप्रकरणांसाठी सादर केलेल्या कागदपत्रांचा अवैध सावकारीसाठी गैरवापर करून कर्जदारांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहायक सहकार अधिकारी तात्यासाहेब भोसले यांनी 3 एप्रिल 2024 रोजी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी आझाद ठुबे याच्यासह रणजीत पाचारणे (रा. शिरूर, पुणे), पोपट ढवळे (रा. हंगा, पारनेर) तसेच पतसंस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी भालेकर (रा. कान्हूरपठार, पारनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आझाद ठुबेसह इतर आरोपी फरार झाले होते. दरम्यानच्या काळात आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. मात्र, सत्र न्यायालयाने ठुबे व भालेकर यांचे अटकपूर्व जामिनाचे अर्ज फेटाळले. त्यानंतर पारनेर पोलिसांनी फरार आरोपींच्या शोधमोहिमेला वेग दिला. अखेर तब्बल साडेतीन महिन्यांनी रविवारी आझाद ठुबे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

तब्बल 150 कोटींच्या ठेवी अडकल्या

राजे शिवाजी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या तब्बल 150 कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या ठेवीदारांची, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठेवींची रक्कम मिळणे बंद झाले आहे. आझाद ठुबे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.