
चाकूर तालुक्यातील गांजूर येथील भावाने चुलत बहिणीचा गळा चिरून स्वतः गळफास घेतल्याची घटना चाकूर तालुक्यातील गांजूर येथे मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे चाकूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सदर खून आणि आत्महत्येमागचे कारण अद्याप उघड झालेले नाही. या दोन भावंडांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते अशी चर्चा सध्या गावात रंगली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गांजुर येथील युवक फेरोज हकानी पठाण (वय 25) हा फरशी बसविण्याचे काम करतो. त्याच्या घरासमोर त्याची दहावीत शिकत असलेली चुलत बहीण अफसाना मन्सूर पठाण (वय 17) तिचे घर आहे. दोघांचे आई-वडील मोलमजुरी करतात. दुपारी साधारण साडे तीन वाजण्याच्या सुमारास फेरोजचा मृतदेह रामकिशन दत्तू शिंदे यांच्या शेताजवळील एका बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली व पंचनामा वगैरे सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. आत्महत्येच्या वेळी फेरोजने पांढरा शर्ट घातलेला होता व त्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग होते.
सायंकाळी अफसानाचे आई – वडील घरी आल्यानंतर दरवाजा उघडताच त्यांना घरात ओढणीने तोंड बांधून अफसानाचा धारदार शस्त्राने गळा चिरलेला आढळून आला. सदर माहिती पोलिसांना समजताच चाकूर येथील पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण आणि पोलिस उपाधीक्षक विद्यानंद काळे घटनास्थळी दाखल झाले. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया चाकूर पोलिसात सुरू होती. फिरोज पठाण हा घरातील एकुलता एक मुलगा असून त्याला दोन बहिणी आहेत तर अफसानाला दोन भाऊ असून ती घरात एक एकुलती एक मुलगी होती. फेरोजच्या शर्टावर रक्ताचे डाग आढळल्यामुळे त्यानेच अफसानाचा खून केला असावा आणि स्वतः आत्महत्या केली असावी या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. मात्र त्याने अफसानाची हत्या का केली याबाबत अद्याप काहीही समजलेले नाही.



























































