चंदा कोचर यांच्या बायोपिक प्रदर्शनावर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला दिल्ली हायकोर्टाने शनिवारी बंदी घातली. ‘चंदा – ए सिग्नेचर दॅट रुन ए करीयर’ असे चित्रपटाचे नाव आहे. चंदा कोचर यांची सीबीआय आणि ईडी यांच्याकडून अद्याप चौकशी सुरू आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी चंदा कोचर यांचे वकील विजय अग्रवाल आणि नमन जोशी यांनी याचिकेद्वारे केली होती.

हा चित्रपट आपल्या आयुष्यावर असल्याचे नुकतेच चंदा कोचर यांना समजले. चित्रपटाच्या शीर्षकातही त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यासाठी कोचर यांची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. सिनेमातील मुख्य अभिनेत्री हीदेखील प्रसिद्धीमाध्यमांशी कोचर यांच्या आयुष्याबद्दल उघडउघड बोलतेय. त्यामुळे अशा पद्धतीचे बायोपिक आणि प्रमोशनल इंटरह्यू चुकीचे आहेत. यामुळे चौकशी प्रभावित होण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद कोचर यांच्या वकिलांनी केला. त्यानंतर हायकोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.