चंदगड तालुक्यात महापुराचे थैमान, लोकांचे स्थलांतर, वीजपुरवठा खंडित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kolhapur-flood

सामना प्रतिनिधी, चंदगड

 

सतत पडणाऱ्या धुवाँधार पावसामुळे चंदगड तालुक्यात अक्षरशः थैमान सुरू असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील महत्त्वाचा असलेल्या फाटकवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याजवळचा काही भाग भगदाड पडल्यामुळे या प्रकल्पा परिसरात तसेच नदी काठावरील सुमारे आठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी स्थलांतर केले. गेली आठवडा कोवाड गाव पाण्यात राहिले आहे. प्रशासनाने सद्यस्थितीत मदत कार्य जारी ठेवले आहे. वीज व दूरध्वनी, मोबाईल सेवा बंद पडल्यामुळे फार मोठा अडथळा निर्माण झाला होता. शनिवारी दुपारनंतर पावसाने थोडी उसंत दिली.

 

चंदगड तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे तालुक्यातील लोकांना पावसाची सवय झाली आहे. मात्र या आठवड्यात सतत पडणाऱ्या पावसाने रौद्र रूप धारण केले आणि तब्बल तीन दशकापूर्वी पडणाऱ्या पावसाची आठवण झाली. पावसामुळे तालुक्यातील ताम्रपर्णी, घटप्रभा नद्यांच्या पातळीत वाढ होऊन बघता बघता पाणी गावा-गावात शिरू लागले. पावसाने एवढे रौद्र रुप धारण केले की आता टेकडीवर-उंचावर राहणाऱ्या लोकांना सुद्धा पुराची भीती वाटू लागली. कोवाड गावात पाणी शिरले, ताम्रपर्णी नदीने कुशीत घेतलेल्या कोवाड गावाला ही नदी आता गिळंकृत करते की काय असा यक्षप्रश्न भेडसावू लागला. 

 

अडकूर जवळच्या पुलावर कधीच पाणी येत नाही मात्र या वेळी आले. चंदगड शहरालगत ताम्रपर्णी नदीचे पाणी जवळ येऊन ठेपल्याने आझाद गल्ली, कुंभार गल्ली, ब्राह्मण गल्लीतील लोकांनी चिंता व्यक्त केली. आझाद गल्लीतील लोकांनी स्थलांतर केले आहे. फाटकवाडी प्रकल्पाच्या सांडव्याजवळचा भाग ढासळत असल्याचे समजल्यावर प्रशासनाने फाटकवाडी प्रकल्पाच्या परिसरातील सुमारे आठ गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला. त्यामुळे पिळणी, भोगोली, कानुर, बिजूर, कुरणी, सडेगुडवळे, फाटकवाडी, हिंडगाव, सतेवाडी या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने तत्परतेने लोकांना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न केले. 

 

फाटकवाडी प्रकल्प तसेच जांबरे प्रकल्पाच्या परिसरातील गावातील लोकांना चंदगड येथे आणून त्यांच्या राहण्याची व्यवस्था रवळनाथ मंदिराच्या हॉलमध्ये तसेच खेडूत शिक्षण मंडळाच्या हायस्कूल, कॉलेज इमारतीमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. चंदगड शहरातील विविध ठिकाणच्या तरुणांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना पाणी, नाश्ता, चहा, जेवण देण्यासाठी सहकार्य केले. एसटी व खासगी वाहनांच्या मदतीने आणलेल्या लोकांना धीर दिला जात होता. अनेकांनी आपल्या जनावरांची चिंता व्यक्त केली. रवळनाथ मंदिर व हायस्कूल परिसरात पूरग्रस्तांची विचारणा करण्यासाठी भर पावसात रात्रीच्या वेळी लोक जात होते. 

 

मुस्लीम समाजातील लोक, तरुण कार्यकर्ते जेवण वाढणे, पाणी देण्यासाठी सरसावले होते. शहरातील विविध ठिकाणच्या लोकांनी यावेळी सहकार्य भावनेच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रांताधिकारी वर्षा पांगारकर, तहसिलदार विनोद रणावरे,पोलीस निरीक्षक अशोक सातपुते व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूरग्रस्तांची विशेष काळजी घेत प्रसंगावधान दाखवलं. पुन्हा शनिवारी सकाळी लवकर फाटकवाडी प्रकल्पाच्या स्थळी पाहणी करून पिळणी गावातील लोकांना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी पुन्हा तहसीलदार रणावरे यांनी डॉ.नंदा बाभुळकर यांच्या उपस्थितीत पिळणीला भेट दिली. रविवारी टाक्स फोर्सच्या मदतीने लोकांना हलवण्यात येणार आहे.