
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र प्रचारामध्ये पातळी सोडून दिली आहे. मुंबईतील चांदिवली येथील वॉर्ड क्रमांक 157 मध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत महापुरुषांच्या पुतळय़ांसमोर अक्षरशः बायका नाचवल्या गेल्या. त्या प्रकाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत असून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? अशी तीव्र प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून उमटली आहे.
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मध्ये भाजप उमेदवार आशा तायडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात येत होते. मात्र याच कार्यक्रमात व्यासपीठावर एका महिलेचा डान्स ठेवला गेला. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर ती महिला अश्लील हावभाव करत नृत्य करत होती. या नृत्य कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांबरोबरच विभागातील नागरिकांनीही याबद्दल भाजपवर टीका केली आहे.
View this post on Instagram
मुंबईकरांनो, यांना एकदाचा शिवटोला देऊयाच!…
शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी या घटनेचा व्हिडीओ एक्सवर शेअर करत भाजपवर सडकून टीका केली आहे. गर्दी जमवण्यासाठी भाजप महापुरुषांच्या प्रतिमेसमोर महिलांना नाचवत आहे हे पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. ‘या कार्यक्रमाच्या आयोजक कोण? तर भाजपचा स्थानिक उमेदवार, संयोजक कोण तर सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपने कोषाध्यक्ष नेमलेला पवन त्रिपाठी. ही असली माणसे आमच्या पवित्र मंदिरावर नेमताना लाज कशी वाटली नाही भाजपला? मुंबईकरांनो, आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही, यांच्या डोक्यात चढलेली सत्तेची मस्ती उतरविण्याची संधी वारंवार येत नसते. यांना एकदाचा शिवटोला देऊयाच’, असे आवाहनही चित्रे यांनी केले आहे.



























































