चंद्राबाबू नायडू, पुत्र लोकेश यांना नजरकैद; आंध्रात राजकीय धुमश्चक्री

473

‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे.

जगनमोहन रेड्डी सरकारच्या विरोधात चंद्राबाबू यांच्या तेलुगू देसम पार्टीने ‘चलो आत्मकुरू’ ही रॅली आज गुंटूरमधील पलनाडू येथे आयोजित केली होती. जगनमोहन सरकार राजकीय हिंसाचार करीत असल्याचे सांगत या हिंसाचाराविरोधात आपली रॅली असल्याचे चंद्राबाबू यांनी जाहीर केले होते, मात्र आंध्र प्रदेश पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारत नरसरावपेटा, सत्तानापल्ले, पलनाडू आणि गुराजलामध्ये कलम 144 लागू करीत जमावबंदी लागू केली. चंद्राबाबू नायडू हे आज सकाळी 9 वाजता आत्मकुरूसाठी घराबाहेर निघणार होते, मात्र त्यांना घरीच रोखण्यात आले.

यानंतर त्यांनी आपल्या घरीच उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. शिवाय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही उपोषण करण्याच्या सूचना केल्या. यानंतर पोलिसांनी त्यांचे पुत्र लोकेश यांनाही नजरकैदेत टाकले. तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांबरोबरच कायएसआरपीसीच्या नेत्यांनाही पोलिसांनी नजरकैदेत टाकले आहे. तेलुगू देसम पक्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनीही हालचाली करू नयेत यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या