माझे वाक्य उलटे वाचले गेले! चंद्रकांतदादांची पलटी

chandrakant-patil

शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटी मारली आहे. माझे विधान उलटय़ा पद्धतीने माध्यमांनी दाखवले असे सांगत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येण्याबाबत हा विषय नव्हता तर निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतचा विषय होता. शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही, असा खुलासा त्यांनी केला.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या पाटील यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा खुलासा केला होता. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वबळावर सरकार आणण्याचे सूतोवाच केले असताना पाटील यांचे याउलट वक्तव्य आल्याने अखेर आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना खुलासा करावा लागला. पाटील म्हणाले, ‘माझं वाक्य उलटं वाचलं गेलं. मी म्हटलं होतं की, जर उद्या आमचं सरकार आलं तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. कारण भाजपच्या वोट बँकेवर आणि मोदींच्या चेहऱयावर विजयी व्हायचं नंतर काही तिसरेच करायचे हे चालणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकाने आपापले लढावे.

चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले होते…

‘राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षांचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत. बिहारमध्ये नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांनी एकत्र निवडणूक लढवली. पण पटत नसल्याने नितेश कुमार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते व भाजपाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात हिंदुत्वाचा असा काही पेच झाल्याने असा बदल व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटले तर ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील. पण निवडणूक मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले त्याप्रमाणे स्वबळावर लढली जाईल. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार आहोत’, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या